दारावर येई कोण ? : एकनाथ आव्हाड
दारावर येई
दरवेशी…
अस्वलाने केली
मज्जा खाशी…
दारावर येई
नंदीबैलवाला…
म्हणे सारं अचूक
सांगतो बोला…
दारावर येई
वासुदेवाची स्वारी…
नाचून गाऊन करी
गंमत न्यारी…
दारावर येई
दाढीवाला साधू…
तोंडात रामरक्षा
हाती त्याच्या गडू…
दारावर येई कधी
भिक्षेकरी…
तुकडा मागून
तो पोटभरी…
नाना तऱ्हेचे
दारावर येई…
आई त्यांच्या झोळीत
काही ना काही देई…
eknathavhad23 @gmail.com
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) मसूरसारखे दिसतात
पण मसूर मात्र नाही
हुलगे या नावानेसुद्धा
ते ओळखले जाई
याच्या डाळीचा सर्दीवर
करतात उपाय
या द्विदल धान्याचे
नाव बरं काय?
२) खिचडीत घालतात
भाजी बनवतात
हिरवे हिरवे ओले
वाळवून ठेवतात
थंड हवामानातील या
पिकाला चांगला भाव
हिंदीत म्हणतात ‘मटर’
मराठीत काय नाव?
३) शेंगा सपाट
फुगीर चपट्या
लुसलुशीत कोवळ्या
पोपटी हिरव्या
वेलीवर येतात
उसळीसाठी वापरतात
कोणत्या शेंगांना
पापडी म्हणतात?