Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजadmission : मी अ‍ॅडमिशन कुठे घेऊ?

admission : मी अ‍ॅडमिशन कुठे घेऊ?

महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपुरते बोलायचे झाले, तर इयत्ता तेरावीसाठीच्या बीए, बी.काॅम, बी.एस्सीच्या जागा कशाबशा भरतात. त्यापेक्षाही वाईट परिस्थिती म्हणजे जागा भरल्या तरी वर्गात पोरे बसतच नाहीत. मग शिकायची इच्छा नसलेल्यांना काय शिकवायचं? असा शिक्षकांनाही प्रश्न पडलेला असतो.

  • विशेष : डॉ. श्रीराम गीत

मी अ‍ॅडमिशन कुठे घेऊ? (Where do I take admission?) हा प्रश्न यंदा तीन मोठ्या गटांना पडणार आहे. दहावीतून अकरावीत जाणारा पहिला गट. काहीही करून इंजिनीअर बनण्याची धडपड करणारा दुसरा गट. अतिहुशारांचा तिसरा गट. ज्यांना आयआयटीला जाऊ? बिट्सला? आयसरला? का अमेरिकेत जाऊ? असे कौतुकाचे प्रश्न पडणार आहेत. बाकीच्या साऱ्यांचे प्रश्न अगदी किरकोळ. म्हणजे नंबर लागला प्रवेश मिळाला, तर आत जायचे. फार फार तर फी परवडते की नाही? एवढाच प्रश्न. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपुरते बोलायचे झाले, तर इयत्ता तेरावीसाठीच्या बीए, बी.काॅम, बी.एस्सीच्या जागा कशाबशा भरतात. त्यापेक्षाही वाईट परिस्थिती म्हणजे जागा भरल्या तरी वर्गात पोरे बसतच नाहीत. शिक्षकांनाही तेवढेच उत्तम. कारण ज्यांना इंजिनीअरिंग, बीबीएसारख्या आकर्षक कोर्सेससाठी जमत वा परवडत नाही, असा सारा वर्ग भरलेला असतो. नाईलाजाने वर्गात बसलेल्यांना, शिकायची इच्छा नसलेल्यांना काय शिकवायचं? असा शिक्षकांनाही प्रश्न पडलेला असतो. आपण एकेका गटाचे वेगवेगळे प्रश्न समजून घेऊ. त्यावरचे काही तोडगेही मी इथे सुचवणार आहे. तोडगे कदाचित पालकांना योग्य वाटतील. मुलांना मात्र ते आवडत नाहीत, असा माझा अनुभव आहे. मात्र तो तोडगा ज्याला पटला, आवडला व अमलात आणला अशा प्रत्येक मुलाचे कल्याण झाल्याचे माझा गेल्या वीस वर्षांचा अनुभव सांगतो.

अकरावीचा केंद्रीय प्रवेश

दहावीच्या मार्कानुसार केंद्रीय पद्धतीने अकरावीचे अॅडमिशन प्रमुख शहरांत होतात. सर्व बोर्डांचे मार्क समतोल करण्यासाठी बेस्ट ऑफ फाइव्ह नावाचे जुगाड केले गेले आहे. त्यात भर म्हणून क्रीडा नैपुण्याच्या, कला नैपुण्याच्या मार्काची भर घातली जाते. गुणांचा फुगवटा वाढतो. मग चर्चा सुरू होते कोणत्या कॉलेजचा प्रवेश ९५%ला बंद झाला, कोणाची दारे ९०% ला तोंडावर आपटली गेली, दोनच मार्काने हवे असलेल्या कॉलेजच्या प्रवेश कसा हुकला, अशा छापून आलेल्या बातम्यांची. जोडीला हवे ते कॉलेज नाही मिळाले म्हणून रुसून-फुगून बसलेल्या, चेहरा पाडलेल्या मुला-मुलींचे घरातले धुमसणे पालकांना सहन करावे लागते. काही पालकांचे स्वतःचे प्रेस्टिज या प्रवेशाआड येत असते. रुईया, रूपारेल, एलफिन्स्टन, झेवियर, फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय किंवा सरस्वती महाविद्यालय येथे प्रवेश मिळाला नाही, तर त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळते. मोठ्या कंपन्यांचे बडे अधिकारी आणि विशेषतः सरकारी अधिकारी व कारखानदार या गटात मोडतात.

काहींचे रस्ते ठरलेले असतात. ते मॅनेजमेंट कोट्याचा रस्ता धरतात. त्यांना फारशी अडचण येत नाही. ज्यांच्या हाती वाट पाहणे यापलीकडे काही नसते ते पहिली फेरी, दुसरी, तिसरी फेरी अशी वाट पाहत, आवडीचे कॉलेज मिळेल या आशेवर तरंगत राहतात व अभ्यासाचे नुकसान करून घेतात. गेल्या वर्षी अशा तरंगणाऱ्या मुलांचा शेवटचा प्रवेश डिसेंबर महिन्याच्या अखेरीला झाला होता एवढीच नोंद करतो.

यावरचा व्यावहारिक तोडगा कोणता?

घरापासून १५ मिनिटांवरील अंतराचे कॉलेज व क्लास घेतला, तर अभ्यासाचा वेळ कसा मिळतो त्याचे आपण सोपे गणित मांडू यात. पंधराऐवजी चाळीस मिनिटे कॉलेजला जाण्यास लागणार असतील, तर एका वेळेची २५ मिनिटे वाचवून म्हणजे रोजचा ५० मिनिटांचा वेळ तुम्हाला हाती राहतो. दोन वर्षे अभ्यास करायचा असतो. त्यासाठी हे किमान ७०० तास हाती येतात.रोजच ५० मिनिटे रस्त्यावरची धूळ, वारा, ऊन, पाऊस खात घालवण्याऐवजी अभ्यासात घालवला, तर किमान दहा टक्के मार्क नक्की वाढतात. तीच गोष्ट क्लासची. जाहिरात पाहून लावलेला क्लास, नामवंत क्लास, महागडा क्लास याऐवजी मुलाने हात वर करून शंका विचारली, तर उत्तर देणारा क्लासमधील शिक्षक हा खऱ्या अर्थाने उपयोगी पडतो. तिथेही मार्क नक्की वाढतात. मात्र कॉलेजचा प्रवेश सुरू होण्यापूर्वीच क्लास लावणे हा सध्याचा विद्यार्थी व पालकांचा आवडीचा छंद बनला आहे. यावर त्यांचं उत्तर एकच ‘नंतर अॅडमिशन मिळाले नाही तर?’ बारावीनंतरचे अॅडमिशन जास्त महत्त्वाचे असते, त्यासाठी लागतात ते टक्के व मनापासून केलेला स्व-भ्यास. पूरक असते ते कॉलेज व क्लास. पाहा पटतंय का?

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी

दुसरा गट आहे तो इंजिनीअरिंगच्या प्रवेशाचा. बारावीचा निकाल हाती आलेला आहे. सीईटीचा निकाल १२ तारखेला लागला आहे. ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या तीन विषयांमध्ये १६५/३०० पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी इंजिनीअरिंगची धोक्याची घंटा वाजली आहे, हे लक्षात ठेवावे व प्रवेश घ्यावा. तसाच दुसरा आकडा म्हणजे सीईटीचा. ७०/२०० पैकी मार्क मिळाले असतील, ते आताच ३५ टक्क्यांच्या पातळीला आले आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. धोक्याची घंटा म्हणजे चार वर्षांचा अभ्यासक्रम पाच किंवा सहा वर्षांत पूर्ण करण्याची हमी. या आकड्यांना अपवाद असतात. मात्र हजारात एखादाच. एकुणात सीईटीचे शंभरपेक्षा जास्त मार्क असतील, तर ते बरे समजावेत. चांगले कॉलेज, चांगली ब्रांच मिळण्याची शक्यता तिथे सुरू होते. ज्यांना १५०/२०० पेक्षा जास्त मार्क पडतील त्यांनाच हवे ते कॉलेज, हवी ती ब्रांच मिळते. हे आकडे पालकांनी व मुलांनी समजून घ्यावेत व त्यानुसार शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत प्रवेश नक्की करावा. शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी इंजिनीअरिंग निवडताना उत्तम कॉलेज असेल, तरच निवडावे. कारण अशाच कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. तिथेच मुलांना नोकऱ्या मिळतात. असे कॉलेज मिळाले नाही, तर कोणतीही कोअर शाखा निवडून चांगले मार्क मिळवावेत. नोकरी आयटीचीच मिळते, असे गेल्या पाच वर्षांतील आकडे सांगतात.

हुशारांचा प्रश्न

आता तिसऱ्या गटाकडे वळूयात. या गटातील सगळ्यांचे गुण उत्तमच असतात. वाटचाल छान असते. मात्र त्यांच्यासमोर विविध उत्तम संस्थांची नावे येत असतात. कोणाला आयआयटी खुणावते, कोणाला बिट्स… पिलानी, हैदराबाद, गोवा येथील कॅम्पस खुणावतात. काहींना आयसर, ट्रिपल आयटीची स्वप्ने दिसतात. यातील काहीच न मिळणारे कोणची एनआयआयटी मिळेल याकरिता इंटरनेटवर शोध घेत राहतात. यांची व त्यांच्या पालकांची मनातील उलघाल विलक्षण असते. ज्याप्रमाणे भारतीय ऑलिंपिक संघामध्ये स्थान मिळते? का न मिळते? या पातळीवरची ही उलघाल असते. अशांना माझे एकच सांगणे असते. तुम्हाला कोणती संस्था आकर्षित करते, त्याचा कारणासकट विचार करा. उदाहरणार्थ मी आयआयटीमधून पास झालो, हे आयुष्यभर सांगायचे असेल, तर तिथे मिळणारा कोणताही कोर्स घ्या. वर उल्लेख केलेल्या सर्व संस्था नामवंत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथून पास झालेल्या किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांना ‘शिकले एक, पण काम करतो वेगळेच’ अशाच स्वरूपाच्या नोकऱ्या मिळण्याचा इतिहास आहे. मग संस्थेला प्राधान्य देऊन शाखेला दुय्यम समजून लवकर अभ्यासाला लागणे व यशस्वी होणे यातून दमदार करिअर होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -