श्री राऊळबाबा (Raul Baba) वेडे झाले होते ते परमेश्वर प्राप्तीसाठी. असले वेडेचार फारच कमी लोकांच्या वाटेला येतात. श्री राऊळबाबा त्या भाग्यवंतांपैकी एक होते. मात्र त्यांची टर उडवणारी मंडळी कालौघात पुढे जाऊन त्यांच्याच पायावर मस्तक ठेवणार होती हे सत्य फक्त त्या ‘रवळनाथालाच’ ठाऊक होतं!
-
कोकणी बाणा : सतीश पाटणकर
करा करा हो जयजयकार
राऊळबाबांचा जयकार
पिंगुळीचा ब्रह्मयोगी हा दत्तांचा अवतार’
या वरील ओळी शब्दश: सार्थ करणाऱ्या परमपूज्य सद्गुरू समर्थ राऊळ महाराज (Sadguru) यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात झाला. ‘सद्गुरू सिंधुदुर्ग’ हे शब्द कानावर आले की, आपल्यासमोर माड-पोफळीची झाडे, मऊसूत लाल माती, खळाळणाऱ्या लाटांची गाज जागवत शिवरायांचे चैतन्य जोपासणारा जलदुर्ग ही दृश्ये येतातच. या निसर्गरम्य पार्श्वभूमीला जसा सौंदर्याचा स्पर्श आहे तशाच विरक्तीच्या छटाही लाभलेल्या आहेत. या विरक्तीतून अाध्यात्माची खरी ओळख आणि निर्माण करणाऱ्या सत्पुरुषांमध्ये श्री राऊळ महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कुडाळ तालुक्यातील ‘पिंगुळी’ या निसर्गसंपन्न टुमदार गावाची ओळख श्री राऊळ महाराजांमुळेच आहे.
दि. १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सावित्रीबाई आणि आप्पाजी राऊळ यांच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे पाळण्यातील नाव जरी ‘श्रीकृष्ण’ असले तरी हा ‘बाळकृष्ण’ फक्त काही काळापुरताच ‘कृष्णाजी’ या नावाने आणि ‘आबा’ या टोपणनावाने ओळखला जाऊ लागला. कारण अध्यात्म जगतात त्याची ओळख पुढे ‘श्री राऊळ महाराज’ या नावानेच दृढ झाली. राऊळ घराणे पारंपरिक चालिरीती मानणारे, सरळ-सालस, देवभोळे आणि पापभीरू होते, कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यातही नाही. ग्रामदैवत रवळनाथाची पूजाअर्चा करण्याची वहिवाट राऊळ कुटुंबाकडेच होती. यांचा मूळ धंदा शेतीचा. मात्र एकत्र कुटुंब असल्याने कर्त्या-सवरत्या माणसांचे शेतीला जोडून असणारे अन्य पूरक धंदेही असल्याने त्याद्वारे संसाराचा गाडा हाकला जात होता.
परमेश्वरी संकेतानुसार जन्म घेतलेल्या ‘आबा’ने आई-वडिलांवरचे गंडांतर तर टाळलेच. शिवाय पुढे जाऊन जगाचाही उद्धार केला. आबांना तीन भाऊ अन् सहा बहिणी. लहानग्या आबाने सगळ्या गावालाच लळा लावला होता. बालवयात ज्ञानोबा-तुक्याचे अभंग आत्मसात करून त्याने सर्वांना चकितही केले. शालेय शिक्षणाची ओढ नसलेल्या आबाने तिसऱ्या इयत्तेनंतर चौथ्या इयत्तेत न जाता निळ्या छताखाली भरणाऱ्या अनुभवाच्या मुक्त शाळेत प्रवेश घेतला. याच शाळेच्या माध्यमातून त्याने पुढे अनेकांना शहाणे करून सोडले. त्यांचा लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा होता. त्याचं शिक्षण तिसरी इयत्तेपर्यंत झालं होतं. पण चार भिंतीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाच्या खुल्या विद्यापीठात ते शिकले. कारण त्यांच्या जीवनाचे लक्ष्य ‘आध्यात्म’ हेच होतं. देवाच्या नामस्मरणात ते रंगून जात असत. त्यांना ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचे अभंग तोंडपाठ होते. ज्ञानेश्वरीही त्यांना मुखोद्गत होती. लहानपणी गुरे राखताना ते भजनात दंग व्हायचे, तसंच मोठे झाल्यावरही ते खड्या आवाजात अभंग म्हणत असत. अखंड हरिनाम हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायी त्यांनी मुंबईतील आपल्या नोकरीलाही रामराम ठोकला. राधाबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतरही ते संसारात कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. संसारातील भवताप पचवताना स्थितप्रज्ञ राहिले.
प. पू. राऊळ महाराज म्हणजे प्रखर योगी पुरुष. त्यांनी १९४५ ते १९७२ अशी २७ वर्षे कठोर ध्यानसाधना केली. त्यासाठी ते कुठे हिमालयात किंवा रानावनात गेले नाहीत, तर स्वत:च्या आईच्या दुकानाला लागून असलेल्या लहानशा खोलीत ते ध्यानाला बसत. ध्यान करताना खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद करीत. जवळजवळ ६ महिने हे ध्यान सुरू असताना ते हळूहळू खाणे-पिणे कमी करत व नंतर तर काहीच घेत नसत.
देवाच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे, रवळनाथाच्या ओसरीवर खड्या आवाजात भजने करावीत, पेटीचे अचूक सूर उमटवीत, पल्लेदार ताना घेत, भान हरपून अभंग गावे यांनाच आपले जीवितकार्य मानून अष्टौप्रहर त्यातच रमणाऱ्या आबाने समाधीवस्थेची परमोच्च पातळी कधी गाठली आणि त्याच्यातून ‘श्री राऊळ महाराज’ हे सद्गुरूतत्त्व कधी प्रकट झालं हे कुणालाही कळलं नाही. श्री राऊळबाबांना घरातील कामकाजामध्ये फारसा रस नव्हता. शिक्षण नव्हते, शेतीकामात लक्ष नसे, घरच्या गाई-म्हशी चरावयास नेल्या, तर रानामध्ये त्यांची समाधीच लागत असे. यामुळे घरच्यांना त्यांची काळजी वाटू लागली. वयात आलेला हा मुलगा लौकिक जगामध्ये राहण्यासाठी आलेलाच नव्हता. मात्र सर्वसामान्यांना ते कसे कळावे? गावात श्री राऊळबाबांवरून कुजबूज व चेष्टा होऊ लागली. पारावरच्या गजालीमध्ये ‘राऊळांचो झील ‘येडो’ झालो, त्याका ‘खूळ’ लागला’ असा सूर निघत असे. एका अर्थी ते योग्यच होते. मात्र वेगळ्या प्रकारे. श्री राऊळबाबा वेडे झाले होते ते परमेश्वर प्राप्तीसाठी, त्यांना खूळ लागले ते हरिदर्शनाचे. असले वेडेचार फारच कमी लोकांच्या वाटेला येतात. श्री राऊळबाबा त्या भाग्यवंतांपैकी एक होते. मात्र त्यांची टर उडवणारी आणि चेष्टा करणारी मंडळी कालौघात पुढे जाऊन त्यांच्याच पायावर मस्तक ठेवणार होती हे सत्य फक्त त्या ‘रवळनाथालाच’ ठाऊक होतं.
इंचगिरी संप्रदायाचे श्री बाळकृष्ण महाराज हे श्री राऊळबाबांचे सद्गुरू. मुंबईच्या गिरगावातील माधवबाग येथे त्यांचे वास्तव्य असल्याने श्री राऊळबाबा अनेकदा मुंबईला येत असत. गुरू सान्निध्यात त्यांची प्रवचने वा कीर्तनाचा आनंद मिळवण्यासाठी श्री राऊळबाबांची धडपड असे. गुरूंसोबत कीर्तनासाठी साथसंगत, तसेच वादन-गायन करणे अशा प्रकारातून त्यांची बाळकृष्णबुवांशी जवळीक वाढली. श्री राऊळबाबांची वैराग्यवृत्ती दिवसेंदिवस वाढू लागली. पिंगुळी गावी जेथे त्यांची समाधी आहे, त्याच जागी बाबांनी ३१ वर्षे ध्यानयोग साधना केली. वर्षातून सहा महिने ते या जागी ध्यान लावून बसत अन् उर्वरित सहा महिने भ्रमंती करीत असत. ध्यान साधनेमध्ये असताना त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असे. दिवसभर एकतारीवर सुरेल आवाजात भजनं म्हणणे हा त्यांच्या ध्यानसाधनेचाच एक भाग होता. सहा-सहा महिने समाधीवस्थेत असताना त्यांचे शरीर लाकडासारखे ताठ होत असे. समाधीतून भानावर आल्यावर ते जागचे हलू शकत नसत. अशा वेळेस त्यांचे हात-पाय चेपून स्नायू ढिले करावे लागत. श्री राऊळबाबांनी कठोर उपासना केली.
एकदा, श्री राऊळबाबांनी त्यांचे पुतणे विनूअण्णा यांच्यापाशी गाणगापूरला जाण्याची इच्छा प्रकट केली. पांडुरंगाचे दर्शन घेऊन भक्त मंडळींसोबत ते परस्पर मुंबईला आले. भाई बांदोडकरांच्या मुंबईतील घरात वास्तव्यास असलेल्या श्री राऊळबाबांना पुन्हा पिंगुळीला जाणे मात्र जमले नाही. त्याऐवजी पिंगुळी गावात पोहोचलेली बातमी मात्र अत्यंत दुर्दैवी आणि पिंगुळीकरांसाठी हृदयद्रावक ठरली. ३१ जानेवारी १९८५ रोजी श्री राऊळ महाराज परब्रह्मतत्त्वात विलीन झाले. त्यांनी आपल्या भक्तांचा कायमचा निरोप घेतला. संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी, कुडाळ येथील भक्त वत्सल प .पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभाऱ्यामध्ये प. पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे.
पिंगुळी येथे श्री राऊळ महाराजांची समाधी आजही त्यांच्या परमपवित्र वास्तव्याची साक्ष देत उभी आहे. येथून ६० कि.मी. अंतरावर साटेली भेडशी येथे श्री राऊळ महाराजांचे स्मारक असून पंढरपूर येथे भक्तनिवासही उभारण्यात आला आहे. परमपूज्य राऊळबाबांनी ‘कृष्ण’रूपाने श्री अण्णांकडून ही सुदाम्याची नगरी आज निर्माण करून घेतली आहे. प.पू. बाबांच्याच आज्ञेने श्री अण्णा महाराज पिंगुळी क्षेत्री आजतागायत अन्नदान करत आहेत. समाधी मंदिर परिसर, पिंगुळी गाव व भाविकांच्या मनावरची जळमटे काढणारे श्री अण्णा महाराज स्वत:चे ‘झाडूवाला’ हे बिरुद सार्थ ठरवत आहेत. प.पू. राऊळबाबांनी पिंगुळी येथे लावलेले औदुंबराचे लहानसे रोप आज भव्य कल्पवृक्ष बनले आहे. प.पू. बाबांची लाडकी माऊली ही आज मोठ्या मंदिरामध्ये दिमाखात विराजमान झाली आहे आणि पिंगुळीक्षेत्री असलेली प.पू. राऊळ महाराजांची संजीवन समाधी आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे. श्री अण्णांनी आपल्या सद्गुरूंची प.पू. राऊळबाबांची दिव्य स्पंदने समस्त भक्तांसाठी जणू काही या समाधीमध्ये जतन करून ठेवली आहेत. प.पू. राऊळबाबा आजही या समाधीमध्ये, पिंगुळीमध्ये व प्रत्येक भक्ताच्या हृदयात चैतन्याने वास करून आहेत.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)