संध्याकाळ होत आली होती. पण भाजीपाला काही संपला नव्हता. राधा आजीच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. आता जवळ-जवळ आठ-दहा तास उलटून गेले होते. पण आजीच्या गल्ल्यात केवळ दहा-बारा रुपयेच जमले होते! आजी रोज सकाळी उठून बाजारात जायची. शंभर रुपयांचा भाजीपाला घ्यायची अन् त्यांच्याच झोपडपट्टीच्या रस्त्यावर भाजी विकायची. गेली दहा-पंधरा वर्षे भाजी विकून ती आपल्या दोन नातवंडांना वाढवत होती, त्यांना शिकवत होती. आजीचा मुलगा आणि सून आजारपणाचं निमित्त होऊन देवाघरी गेले होते. तेव्हापासून दोन नातवंडांची जबाबदारी राधा आजीनेच घेतली होती. पण आजचा दिवसच वेगळा होता. आजीची कसोटी पाहणारा होता. सकाळी मोठ्या बाजारातसुद्धा भाजी खूपच महाग होती. तरीसुद्धा आजी शंभर रुपयांची भाजी घेऊन नेहमीप्रमाणे रस्त्यावर बसली होती.
मेथी, शेपू, गवार, भोपळा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर अशा अनेक भाज्या आजीने विकायला ठेवल्या होत्या. पण का कुणास ठाऊक आज भाज्याच विकल्या गेल्या नाहीत. लोक यायचे अन् नुसतीच चौकशी करून निघून जायचे. हळूहळू अंधार पडू लागला. शेजारी बसणाऱ्या बायका आपला उरलेला माल बांधून घराकडे निघाल्या. निघताना, “अगं ये राधा आज्जे उठ चल किती अंधार पडायला लागलाय बघ!” पण आजीला काळजी होती पोरांची. घरात दूध नव्हते. मोठ्या नातवाला दोन पुस्तकं अन् वह्या घ्यायच्या होत्या. छोट्या नातीला कालपासून बारीक ताप येत होता. तिला डॅाक्टरकडे न्यायचे होते अन् हे सारे बारा रुपयांत कसे होणार याची काळजी राधा आजीला लागली होती!
तितक्यात एक भली मोठी कार आजी समोर येऊन थांबली. त्यातून एक बाई गाडीतून उतरली. आजी त्या गुलाबी साडीतल्या बाईकडे बघतच बसली. त्या बाई हसतमुखानेच आजीला म्हणाल्या, “काय आजीबाई कशी दिली भाजी?” आजीचा आपल्या डोळ्यांवर अन् कानांवर विश्वासच बसत नव्हता. कारण या अशा झोपडपट्टीच्या गलिच्छ वस्तीत आपल्या मोटारीने भाजीपाला घ्यायला कोण येईलच कसं? “आजी कशी दिली भाजी?” त्या बाईंच्या प्रश्नाने आजी भानावर आली. आजीने भरभर भाज्यांचे भाव सांगितले. वर “सगळ्या भाज्या ताज्या आहेत बरं” असंही ती म्हणाली. मग त्या बाईंनी आपल्या नोकराला हाक मारली. आजीची सर्व भाजी घ्यायला सांगून तिच्या हातात काही नोटा कोंबून ती बाई आपल्या गाडीत बसून निघूनदेखील गेली. आजी आणि तिच्या आजूबाजूची बाया माणसं झाला प्रकार आवाक् होऊन बघत बसली!
हातातल्या नोटा गच्च पकडून आजी घरी आली. आणलेल्या नोटा नातवाकडे देत म्हणाली, “बाळा बघ रे जरा मोजून किती रुपये आहेत ते?” नातवाने नोटा मोजल्या अन् आजीला म्हणाला, “आजी दहा हजार रुपये आहेत बरं!” नातवाने दहा हजार म्हणताच, आजी चकीत झाली. कोण ती बाई अन् तिने आपल्याला एवढे पैसे का दिले? आजी विचार करू लागली. तोच नातू म्हणाला, “आजी ही बघ चिठ्ठी.” नातू चिठ्ठी वाचू लागला, त्यात लिहिलं होतं, “राधा आजी किती दिवस शोधत होते तुला. पण आज भेटलीस. आता यापुढे तुझी अन् तुझ्या नातवंडांची जबाबदारी माझी. उद्या आम्ही तुला न्यायला येणार आहोत. आता तुम्ही नव्या घरात राहायला जाणार आहात.” चिठ्ठीच्या खाली नाव होतं… “तुझीच सुवर्णा काळे!”
नाव ऐकताच आजीचे डोळे चमकले. अरेच्चा हीच ती सुवर्णा काळे. याच मुलीला लहानपणी आपण एका अपघातातून वाचवलं होतं. बिचारी मरता-मरता वाचली होती. तिला वाचवण्याच्या नादात राधा आजीचा एक पाय कायमचा अधू झाला होता. ती चिमुकली ‘सुवर्णा’ राधा आजीला आता स्पष्ट दिसू लागली. अन् तिने आकाशाकडे बघत मोठ्या भक्तिभावाने आपले दोन्ही हात जोडले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…