Monday, November 3, 2025
Happy Diwali

Radhika Santvanam : ‘राधिका सांत्वनम’

Radhika Santvanam : ‘राधिका सांत्वनम’

विशेष : डॉ. श्वेता चिटणीस

एक काव्यमय संध्याकाळ, दोन डॉक्टर स्टेजवर अभिवाचन करणारे आणि आम्ही सारे प्रेक्षक, पार खीळलेले! मंत्रमुग्ध! "राधिका सांत्वनम" या शृंगारकाव्याचे नाट्यमय अभिवाचन, तेही एका गणिकेने ब्रिटिशपूर्व काळात लिहिलेले... एक अतिशय तरल अनुभव देणारे आहे. डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर रूपाली अभ्यंकर यांनी नाट्यपूर्ण अभिवाचनाने हे काव्य फुलवत नेलं. डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी मूळचे तेलुगू भाषेतील काव्य "राधिका सांत्वनम" मराठीत अनुवादित केले. हे तेलगू काव्य कवयित्री मुद्दुपलानी आणि हे काव्य काही वर्षांनी ज्यांच्या हातात आले त्या रत्नम्मा यांच्यामुळे समाजासमोर आलं.

या काव्याचा इंग्रजी अनुवाद झाला, जो डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांच्या वाचनात आला. हे काव्य इंग्रजीत वाचत असतानाच डॉक्टर अभ्यंकर यांना मराठी अनुवाद करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी हे काव्य मराठीत आणलं. गद्य भाषांतर करण्यापेक्षा पद्य भाषांतर करणे हे केव्हाही कठीणच काम आहे; परंतु डॉक्टर अभ्यंकर यांनी ते लीलया पेलले आहे.

हे काव्य सादर करताना नेपथ्यामध्ये स्टेजच्या एका कोपऱ्यात एक टेबल दोन खुर्च्या आणि टेबलावर दोन ग्रंथ इतकी सामग्री वापरण्यात आली आहे. अभिवाचन डॉक्टर रूपाली अभ्यंकर आणि डॉक्टर शंतनू अभ्यंकर आळीपाळीने करतात. दोघेही पारंपरिक वेशभूषा करून हे काव्य सादर करतात. म्हणजेच डॉक्टर रूपाली पारंपरिक नऊवारी साडी आणि इतर नथीसकट महाराष्ट्रीयन दागिने घालून, तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर अगदी पगडी, अंगरखा इत्यादी पारंपरिक पद्धतीने हे काव्य सादर करतात. काव्यवाचन करत असताना त्यांच्या पाठीमागे स्क्रीनवर या काव्याच्या ओळी उमटत जातात आणि त्यामुळे प्रेक्षक हे काव्य वाचू शकतात. यामुळे हे काव्य प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत हळुवारपणे फुलत जाते.

या काव्यातील पात्र राधा, कृष्ण व इला यांची प्रेमकथा उलगडत जाते. अगदी नाट्यमय पद्धतीने केलेल्या अभिवाचनामुळे. डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे काव्य वाचताना राधेच्या मनातले सुंदर भाव उलगडून दाखवतात तसेच ती जेव्हा तिच्या प्रिय पोपटासोबत कृष्णाकडे निरोप पाठवते, तेव्हा त्या पोपटाचे संवादसुद्धा पोपटाच्या वेगळ्या आवाजात म्हणून दाखवतात. डॉक्टर रूपाली राधेचे प्रेम, दुःख, राग हे सारं अभिवाचनातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात तसेच मध्ये-मध्ये त्या मूळ इंग्रजी ओळीसुद्धा वाचून दाखवतात, त्यामुळे एक सुंदर वातावरण निर्माण होते.

ही जरी एक शृंगारकथा असली तरीसुद्धा ते कुठेही अश्लील वाटत नाही कारण, डॉक्टर अभ्यंकर यांनी पूर्ण अभ्यासांती अनुवाद केलेला आहे. काव्याचे वृत्त, लय, चाल हे वातावरण निर्मितीत भर घालतात व त्यामुळे हे काव्य कुठेही अश्लील वाटत नाही. मुळात मुद्दुपलानीने हे काव्य लिहिण्याचे धाडस केले आहे, व डॉक्टर अभ्यंकर पती-पत्नींनी हे शृंगारिक काव्य मराठीत अभिवाचन करण्याचे धाडस केले आहे.

हा प्रयोग डॉक्टर सुहास पिंगळे व राजेंद्र मंत्री यांनी विलेपार्ले येथे फक्त निमंत्रितांसाठी उत्तम प्रकारे आयोजित केला. असेच या सुंदर अभिवाचनाचे अनेक प्रयोग होत राहो. मराठी प्रेक्षकांना या काव्याचा आस्वाद घेता यावा,

यासाठी डॉक्टर श्री. व सौ. अभ्यंकरांना खूप खूप शुभेच्छा!

Comments
Add Comment