Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनPolitics in Maharashtra : लक्ष्मणरेषा...

Politics in Maharashtra : लक्ष्मणरेषा…

  • स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात १३ जून २०२३ च्या मुंबईतील काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आणि राजकारणातील अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. एका सर्व्हेची आकडेवारी या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे) युती महाविकास आघाडीपेक्षा लोकांना कशी अधिक पसंत आहे हे ठसविण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा कसे जास्त लोकप्रिय आहेत, हेही केलेल्या सर्व्हेतील टक्केवारीतून दाखविण्यात आले. मग प्रश्न असा पडतो की, भाजप-शिवसेना युती ही महाआघाडीपेक्षा लोकप्रिय आहे, हे दाखविण्यासाठी ही जाहिरात होती की, शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त सरस आहेत याचे प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न होता? या जाहिरातीने राजकारणाचा माहोलच बदलून गेला. भाजप-शिवसेना युतीला तडे गेले इथपासून शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले, इथपर्यंत अशा असंख्य आरोप-प्रत्यारोपांनी महाआघाडीच्या नेत्यांनी भरपूर तोंडसुख घेतले. मी असे बोललोच नाही किंवा आमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असा खुलासा करण्यास शिवसेना शिंदे गटाला वावच नव्हता. जे काही प्रसिद्ध झाले, ते डझनभर वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील रंगीत जाहिरातीत स्पष्ट होते.

शिवसेना व एकनाथ शिंदेंचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणाऱ्या या जाहिरातीनंतर भाजपमधून झणझणीत प्रतिक्रिया उमटल्याच. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठा सेनेलाही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची आयती संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी मात्र त्याच वृत्तपत्रांत दुसरी पानभर रंगीत जाहिरात प्रसिद्ध झाली आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेकांकडे बघतानाचे मोठे हसरे फोटो होते. दुसऱ्या दिवशीच्या जाहिरातीत मोदींबरोबर अमित शहा एका बाजूला, मध्यभागी कमळ व धनुष्यबाण आणि शेजारी धर्मवीर आनंद दिघे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो झळकले. दुसऱ्या जाहिरातीत शिंदे व फडणवीस यांचे हात उंचावलेले जोडीचे फोटो बघायला मिळाले. दुसऱ्या जाहिरातीत शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांचेही फोटो प्रसिद्ध झाले. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’, अशा लक्ष वेधून घेणाऱ्या ओळीही होत्या.

पहिल्या जाहिरातीत फडणवीसांचा फोटो नाही, उल्लेख नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून २६ टक्के, तर फडणवीसांना २३ टक्के लोकांची पसंती आहे, असे दाखवून ‘शिंदे हेच वरचढ’ असे सांगणारी पहिली जाहिरात होती. ‘मी पुन्हा येईन’ किंवा ‘देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र’ या घोषणेला छेद देणारी पहिली जाहिरात होती.

केवळ शिवसेनेचा बेंजो वाजविणाऱ्या जाहिरातीनंतर फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी न बोलताच मोटारीत बसून निघून गेले. दुसऱ्या दिवशी शिंदेंबरोबरच्या ‘शासन आपल्या दारी’ या कोल्हापूरच्या कार्यक्रमालाही ते गेले नाही. आपला कान दुखतोय सांगून मुंबईतील कार्यक्रमालाही ते गैरहजर राहिले. शिंदे व फडणवीसांमध्ये काही तरी बिघडले आहे, या चर्चेला उधाण आले, ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या शेरेबाजीमुळे.

प्रवीण दरेकरांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले, “प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा हक्क आहे, पण दुसऱ्याला कमी लेखून नाही.”

जाहिरात वादानंतर दोन दिवसांनी शिंदे व फडणवीस हे दोघेही पालघरच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले. एकाच हेलिकॉप्टरने पालघरला गेले. पण धावपट्टीवरून ते दोघे वेगवेगळ्या मोटारीने कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले, याचीच चर्चा अधिक झाली. कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही दोघे हेलिकॉप्टरने आलो तेव्हा, एका पत्रकाराने विचारले, तुम्ही दोघांनी एकत्र प्रवास केलात, कसं वाटत आहे?” मी म्हटले, “आमचा प्रवास २५ वर्षांपासून एकत्र चालू आहे. गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला. आमच्या प्रवासाची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी किंवा केवळ सत्ता मिळविण्यासाठी सरकारमध्ये नाही. सामान्य जनतेच्या जीवनात सामाजिक व आर्थिक परिवर्तन व्हावे यासाठी आम्ही सरकार चालवत आहोत.”

“काही लोक, आम्हाला धरम-वीर, तर काही जय-वीरू म्हणतात. आमच्यात दरी निर्माण होऊ शकत नाही. सरकार एका विचाराचे आहे. पंचवीस वर्षांपासूनची जीवाभावाची मैत्री आहे. ये फोव्हिकॉल का जोड हैं, टुटेगा नहीं” असेही शिंदे सांगत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचा ‘महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा आदरपूर्वक उल्लेख करताच अनेकांचे डोळे विस्फारले तसेच अनेकांना सुखद धक्काही बसला. फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडताना म्हटले, “एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काही (बरे- वाईट) होईल, एवढं सरकार तकलादू नाही. हे काही जुनं सरकार नाही, की कुणी आधी भाषणं करायचं, कुणी नंतर, यासाठी एकमेकांची गचांडी पकडणारे आम्ही बघितले आहेत.”

पालघरच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात एकमेकांना लोकप्रिय आणि जीवाभावाचे दोस्त संबोधून शिंदे व फडणवीस यांनी जाहिरात वादावर मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समजावणार कोण?

वसंतदादा पाटील, शरद पवार, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गज नेत्यांचे पुत्र किंवा कन्या ते मुख्यमंत्रीपदावर असतानाही राजकारणात सक्रिय होते, तेव्हा असा वाद ऐकायला मिळाला नाही. मग आताच एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत यांच्याविरोधात मित्रपक्षातील एका गटाकडून का नाराजी व्यक्त होत आहे. आमची मैत्री घट्ट आहे, असे शिंदे यांना सांगावे लागले. हा विश्वास शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे. ठाणेच काय कल्याण आणि पालघरही आम्ही लढवणार, असा निर्धार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर धुसफूस प्रकट होऊ लागली. डोंबिवलीमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो व त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या मागणीला जोर चढतो, हा शीतसंघर्षातील एक कळीचा मुद्दा ठरला. सरकारमध्ये शिंदे शिवसेनेचे ९ मंत्री आहेत, पैकी ५ मंत्र्यांना हटवावे, अशी सूचना भाजप श्रेष्ठींनी केली, अशा बातम्या वायुवेगाने पसरल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली. जर अमित शहा, शिंदे व फडणवीस या तिघांमध्येच बैठक झाली असेल, तर त्यातील चर्चेची माहिती मीडियाला कळली कशी? ५ मंत्र्यांना हटवावे, अशी श्रेष्ठींनी सूचना केली आहे, यात तथ्य किती?

शिवसेनेची भलावण करणारी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने ज्यांना ती मिळाली ती वृत्तपत्रे खूश झाली. ज्यांना मिळाली नाही, ती दुखावली गेली. टीव्ही मीडियाला यात काहीच लाभ झाला नाही म्हणून त्यांची नाराजी आणखी वेगळी. जाहिरात पक्षाने दिलीच नाही, कोणी हितचिंतकाने दिली, असा खुलासा शिवसेनेच्या एका मंत्र्याने केला. जाहिरातीत काही चूक असेल, तर उद्या दुरुस्त करू, असे दुसरा मंत्री सांगतो. जाहिरात कोणी दिली? याचा उल्लेख जाहिरातीत नाही, हे आणखी वेगळेच. पण या जाहिरात वादामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री पुत्राला एका खोलीत बसून चर्चा करावी लागली व ‘संयम पाळा’ असा संदेश घेऊन चर्चा संपली.

ठाकरे सरकारला सत्तेवरून हटवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार येऊन येत्या ३० जून रोजी एक वर्षे होईल. सरकारमध्ये केवळ १८ मंत्री आहेत. वर्ष झाले तरी विस्तार होत नाही, महामंडळाच्या नेमणुका नाहीत. महापालिका निवडणुका कधी होणार? हे कोणी सांगू शकत नाही. २०२४च्या लोकसभेची तयारी मात्र जोरात सुरू आहे.

जाहिरातीनंतर “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही”, अशी टीका भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांनी केली. तुम्ही खोडी काढली, तर आम्ही गप्प बसणार नाही, हाच त्यातून इशारा होता. मुंबईत मंत्रालयापासून ते विमानतळापर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे बॅनर्स झळकत होते.

सबल भुजाओं मे रक्षित हैं।,
नौका की पतधार,
चीर चले सागर की छाती,
पार करे मजधार…

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -