मुक्तहस्त : अश्विनी पारकर
सायकॉलॉजिकल थ्रिलरला भारतीय पुराणाशी जोडून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या असूर वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पसंतीसही उतरला. या वेबसीरिजमध्ये असूरच्या पहिल्या सीझनमध्ये दिसलेला आतल्या गाठीचा विलन रसुल या सीझनमध्ये कटकारस्थानी निघाला. या विलनना पडद्यावर साकार केलंय ते बोलक्या अमेय वाघने. त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध असणारं हे कॅरेक्टर साकारणं त्याच्यासाठी किती आव्हानात्मक होतं हे त्यानेच स्वत:च्या शब्दांत सांगितलं आहे…
असूरमध्ये माझ्या डोळ्यांच्या एक्सप्रेशन्सच्या शेड्सना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यामुळे या सीझनमध्ये आणखी काय पाहायला मिळणार? असे प्रश्न मला विचारले जात होते. रसुलचं कॅरेक्टर यावेळी नेमकं कशा पद्धतीनं उलगडतं यासाठी तुम्हाला जिओ सिनेमावर असूरचा सीझन-२ पाहावा लागेल. पण मराठीमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवल्यावर हे कॅरेक्टर साकारणं नक्कीच आव्हानात्मक होतं. मराठीमध्ये मी विलनचं पात्र अथवा पूर्ण नेगेटिव्ह शेड साकारलेली नाही. पण असूर-२ मध्ये मला ही संधी मिळाली. असूरमुळे मी मराठीसोबत हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो. एखाद्या परदेशी व्यक्तीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेट बघायचं असेल आणि त्यासाठी त्याने पर्याय विचारले, तर असूर व असूर-२ चं नाव त्यात असेलच. याचं कारण असं आहे की, असूरमधील कथानकात इंडियन मायथॉलॉजीला फार सुंदररीत्या कनेक्ट करण्यात आलं आहे. आपण सर्वजण इंडियन मायथॉलॉजीशी कनेक्ट होतो. त्यामुळे साहजिकच जेव्हा या माध्यमातून एखादी कथा सांगितली जाते, तेव्हा ती प्रेक्षकांच्या जास्त जवळ जाते.
त्यातही ओटीटी हा असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे प्रेक्षकांना त्यांचा आवडता कंटेट त्यांच्या सोयीनुसार पाहता येतो. त्यामुळे ओटीटीकडे प्रेक्षकांचा कल जास्त वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. मराठीतील अनेक कलाकार तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसतात, कारण ओटीटीला चांगल्या कौशल्याची गरज असते आणि हीच मराठी कलाकारांची दमदार बाजू आहे. मलाही हिंदी वेबसीरिजमध्ये काम करायला मिळाल्याचा आनंद होतोय. पण त्याच वेळी माझं मराठीतलं कामही सुरू आहे. माझा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ नावाचा मराठी सिनेमा नुकताच येऊन गेला आणि आता नागराज मंजूळे यांच्यासोबत ‘फ्रेम’ हा सिनेमा येत आहे. अमर फोटो स्टुडिओचे शेवटचे प्रयोग मी केले. त्यामुळे मराठीत काम सुरूच राहील. मराठीमध्येही ओटीटी प्लॅटफॉर्म्स, वेबसीरिज कात टाकू लागले आहेत. एक कलाकार म्हणून मला वाटतं की, मराठीत कथानक चित्रपटापुरतं मर्यादित न राहता त्याची वेबसीरिज व्हावी. असं जर इंट्रेस्टिंग कथानक असेल, तर मला त्यात कलाकार म्हणून भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. मी त्याची वाट पाहतोय.