धर्माबाद: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे जणू समीकरणच झाले आहे. या कार्यक्रमाला उसळणाऱ्या गर्दीमुळे आणि त्या गर्दीतील हुल्लडबाजीमुळे पोलिसांची तर दमछाक होतेच पण यावेळी गौतमीनेच या हुल्लडबाज प्रेक्षकांना बघुन तिचा कार्यक्रम अवघ्या दीड मिनिटांत गुंडाळला.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील धर्माबाद येथे प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यात आले होते. प्रेक्षकांची तुडूंब गर्दी झाली होती. सुरक्षेसाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते. महिलांची गर्दीही लक्षणीय होती. संपूर्ण मैदान तुडूंब भरलेले होते. स्टेजसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. गौतमी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता स्टेजवर आली. तिने प्रेक्षकांशी थोडा संवाद साधला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
गौतमीने तुम्हा बघून तोल माझा गेला… या पहिल्याच गाण्यावर सादरीकरण सुरू केले. गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा पाहून प्रेक्षकांमधून टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या. प्रेक्षकांनी जागेवर उभं राहून डान्स करत जोरजोरात गोंगाट सुरू केला. काही जणांनी हुल्लडबाजी सुरू केली. गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमारही केला. यानंतर प्रेक्षक अधिकच चवताळले. अधिकच गोंधळ सुरू झाला. काही प्रेक्षकांनी मैदानातच खुर्च्यांची मोडतोड सुरू केली. मैदानात पळापळ सुरू झाली. तर काही प्रेक्षकांनी बॅरिकेड्स तोडून स्टेजजवळ गर्दी केली. दरम्यान, हा गोंधळ पाहून गौतमीने प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण गोधळ थांबत नसल्याने गौतमीने कार्यक्रम बंद केला. गौतमीने फक्त दीड मिनिटे सादरीकरण करून निघून गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला.