देवदर्शन

  358

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


केवळ मंदिरात गेलो म्हणजे देवदर्शन घडते असे नव्हे, तर देवाचे दर्शन चराचरांत घडते. एखाद्या लहानग्याच्या निरागसतेत, उन्हाच्या काहिलीत अलगद आलेल्या सरींत, एखाद्याच्या प्रसन्न मुद्रेत तसेच निष्पर्ण जमिनीत मध्येच एखादा बहरलेला वृक्षरंग दिसला की, जे घडते ते म्हणजे देवदर्शन! पाहा तर जरासे संवेदनशील होऊन अनुभवता येते का असे ‘देवदर्शन’?



तीन वर्षांतून एकदा तरी सहपरिवार कुलदैवताचे दर्शन करावयास जावे, असे म्हटले जाते. आमचे कुलदैवत म्हणजे ‘श्रीक्षेत्र माहूरगडची रेणुकादेवी’. महिनाभर आधी रेल्वेचं बुकिंग केले. मुंबई-नांदेड ट्रेनचा जवळजवळ बारा तासांचा प्रवास. मला नेहमी एखाद्या ठिकाणी मनापासून जावसे वाटते. पण कुठचाही प्रवास मग तो रेल्वेचा, बसचा वा विमानाचा असो बिलकुल आवडत नाही, असे वाटते. परिकथेसारखी जादूची चटई मिळावी नि क्षणात इच्छित स्थळी पोहोचता यावे. पण म्हणतात ना कष्टाशिवाय फळ नाही आणि इथे तर देवदर्शन म्हणजे खडतर प्रवास असायलाच हवा!



ट्रेनच्या प्रवासात आमच्यासमोर बसली होती एक बंगाली मुलगी. वय फार तीन-चार वर्षे. काही क्षणातच आमची छान गट्टी जमली. आम्ही इंग्रजी वा हिंदीत बोलायचो. ती बंगालीत. दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नव्हती तरीही ती बोलताना खळखळून हसायची. बहुधा आम्हाला आनंद देण्यासाठी ती हसत असावी. तिची ही निरागसता आमच्यासारख्या मोठ्या माणसांत आली, तर जग किती सुंदर होईल, असं वाटत राहिले. या अल्लड निरागसतेत मला देवाचं दर्शन घडले. ती मुलगी नाशिकला उतरली अन् ट्रेनचा निरस प्रवास जाणवू लागला. तसंही नाशिक येईपर्यंत थोड्याफार प्रमाणात का होईना, बाहेर हिरवाई जाणवत होती. पण नाशिक गेल्यानंतर नांदेडपर्यंत बाहेर डोकावताना दिसत होती, फक्त निष्पर्ण झाडे. एव्हाना सूर्यही डोक्यावर आला होता, त्यामुळे झाडांच्या सावल्याही गुदमरल्या होत्या.



मनमाडला साधारण पस्तीशीची अमेरिकन स्त्री ट्रेनमध्ये चढली. कॅलिफोर्निया (यू.एस.)वरून ती जानेवारीत भारताच्या दौऱ्यावर आली होती. मुंबई, गोवा, केरळ वगैरे पाहून अजिंठा-वेरुळ येथील लेणी पाहण्यासाठी औरंगाबाद येथे जात होती. ‘सायकॉलॉजी’ या विषयाची ही विद्यार्थिनी इगतपुरीला जाऊन विपश्यनेचा अनुभवही घेऊन आली होती. भारतात सहा महिने राहिली असल्यामुळे तिचे इंग्रजी मला आणि माझे इंग्रजी तिला बऱ्यापैकी कळत होते. भारताबद्दल भरभरून बोलत होती. तिला जेव्हा कळले की, मी देवदर्शनासाठी चालले आहे, तेव्हा ती म्हणाली की, भारतात देवळात गेल्यावर मनःशांती मिळते आणि शरीरभर अशा काही संवेदना जाणवतात की, तेथून उठावसेच वाटत नाही. मनात आले की, इतक्या वेळा आपण देवळात जातो, आपल्याला का नाही जाणवत कोणत्याच संवेदना? हे सगळे तिच्याकडून ऐकताना तिच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून मला देवदर्शन घडले.



नांदेड-माहूर हा प्रवास साधारण दोन तासांचा. जूनचा पहिला आठवडा असल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेत नांगरून पहुडलेली सजीवांबरोबर निर्जीव जमिनीलाही पावसाचे वेध लागल्याचे दिसत होते. एका गोष्टीची गंमत वाटली. ५-२५ हिरवी झाडे सोडून निष्पर्ण झाडांवर सुबक असे सुगरण पक्ष्यांचे २५-३० खोपे लटकलेले. या सगळ्या रखरखीत पार्श्वभूमीवर ही सुगरणींच्या खोप्यांनी सजलेली झाडे लक्ष आकर्षून घेत होती. पावसाच्या चाहुलीने आपल्या पिल्लांची त्यांनी व्यवस्थित सोय करून ठेवलेली. काही मरतुकडे बैल, मान लटकून चालणाऱ्या शेळ्या ढणढणीत नदीच्या पात्रात फिरताना दिसल्या. थेंबाथेंबांसाठी आटापिटा करणाऱ्या बायका रिकामे हंडे घेऊन दूरवर चालत जात होत्या. मनात आले आज जागतिक पर्यावरण दिन. कुठल्यातरी देशांमध्ये फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद होईल. सजीव-निर्जीव, हवा-पाणी, प्राणी-पक्षी, जमीन-जंगल या सगळ्यावर छान चर्चा होईल आणि पुढे काही काहीच होणार नाही. अशा परिस्थितीत मी देव नेमका कोठे शोधावा? इतक्यात एक बहरलेले गुलमोहराचे रक्तरंगी झाड समोर दिसले आणि मला देवदर्शन घडले!



pratibha.saraph@gmail.com

Comments
Add Comment

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत

‘वंदे भारत‌’मुळे नव्या काश्मीरची उभारणी

विशेष : प्रा. सुखदेव बखळे कतरा ते श्रीनगर या ‌‘वंदे भारत एक्स्प्रेस‌’ला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ

मुले मोठी होताना...

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजर्सना वाढवणं जेवढं कठीण तेवढेच टीनएजर होणंही अवघड. असं का बरं? कारण आपल्या

आषाढ घन

माेरपीस : पूजा काळे किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो... खुल्या चांदण्याची

सोशल मीडिया आणि वैवाहिक जीवन

आरती बनसोडे (मानसिक समुपदेशक, मुंबई ) पूर्वीचा काळ आणि हल्लीचा काळ यामध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे वाढत्या

ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे