अचानक उमेश कविता नावाची स्त्री व २ वर्षांच्या मुलासोबत घरी आला व घरातल्या लोकांना त्याने सांगितलं, “ही कविता माझी पत्नी आणि हा माझा मुलगा वरुण.” हे ऐकताच उषाच्या पायाखालची जमीन सरकली व घरातील लोकांना धक्का बसला.
-
क्राइम : अॅड. रिया करंजकर
संगीताची दोन लग्न झालेली होती. पहिले लग्न तिने आपल्या मर्जीने केलेले होते. पण काही कारणास्तव संगीताच्या पतीने तिला सोडून दिलं होतं. त्या पतीपासून तिला सरला नावाची मुलगी होती आणि घरातील लोकांनी संगीताचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं होतं. सरला ही आता संगीता आणि तिचे नवीन वडील यांच्यासोबत राहत होती. संगीताला आता दुसऱ्या पतीपासून मुलगी झालेली होती. सरला ही वयात आल्यावर तिचं लग्न लावून द्यायचं. असा विचार सरला आणि तिच्या कुटुंबाने केला. त्याप्रमाणे वरपक्षाची शोधाशोध सुरू झाली. सरलासाठी योग्य असा वर मिळाल्यानंतर वराकडची मंडळी सरलाला पाहण्यासाठी तिच्या घरी आले. सरला ही वर पक्षाला पसंत पडली. त्यावेळी वर पक्षाची बहीण ही संगीताने आपल्या भावासाठी द्याल का? असा प्रश्न केला. वराच्याही बहिणीच्या लग्नाची पाहणी चालली होती.
चालून संधी आल्यामुळे वराकडच्या मंडळीने मुला-मुलींची पसंती घेऊन तेही लग्न ठरवलं. म्हणजेच सरलाची नणंद ही तिच्या मामाला देण्यात येणार होती. जे एका बाजूने नणंद व दुसऱ्या बाजूने मामी असं नातं होणार होतं. तिचं नाव होतं उषा. उषाचे तसंच होणार होते. सरला ही एका बाजूने भाची व दुसऱ्या बाजूने भावजय. नात्यांमध्ये गोतावळा झाला होता. सरला आणि उषा यांची ठरल्याप्रमाणे लग्न व्यवस्थित पार पाडली. उषा नांदायला आपल्या सासरी आली. पती उमेश लग्न झाल्यापासून तिच्याशी काही व्यवस्थित वागत नव्हता. उषाचे सासू सासरे म्हणत होते, “अगं थोडा वेळ दे, वागेल तो व्यवस्थित. आमचा मुलगा साधा सरळ आहे. त्याच्यामुळे तुझ्याशी कसं बोलावे, वागावे त्याला कळत नाहीये. त्यामुळे तू थोडा वेळ त्याला दे.” लग्न झाल्यापासून उमेश याने उषाला कुठे फिरायला नेलं नव्हतं व नेहमीच तो रात्रपाळीला कामाला जात होता. लग्न झाल्यापासून त्याने रात्रपाळी घेतली होती. नेमकं समजत नव्हतं की, आपला नवरा खरेच साधाभोळा आहे की, तो जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
इकडे सरलाचा संसार व्यवस्थित चालू होता. ती आपल्या संसारात रममाण झालेली होती. एक दिवस अचानक उमेश कविता नावाच्या स्त्रीसोबत एका दोन वर्षांच्या मुलासोबत घरी आला व घरातल्या लोकांना त्याने सरळ सांगितलं, “ही कविता माझी पत्नी आणि हा माझा मुलगा वरुण.” हे ऐकताच उषाच्या पायाखालची जमीन सरकली व घरातील लोकांना धक्का बसला. एवढेच नाही, तर उमेश याने सरळ सांगितलं की, आजपासून कविता आणि वरुण ही याच घरात राहणार आहेत. उषा हिने या सर्व गोष्टी आपल्या माहेरच्या लोकांना कळवल्या. माहेरची लोक उषाच्या सासरी आली. या गोष्टीचा खुलासा मागितला. उषाच्या सासरची लोक म्हणायला लागली की, आम्हाला याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं. दोन वर्षांचा मुलगा होईपर्यंत खरंच घरातल्या लोकांना काय माहीत नव्हतं का? असा प्रश्न उषाच्या माहेरच्या लोकांनी विचारला. उमेशला त्याने प्रश्न विचारला लग्न ठरताना का नाही सांगितलं?, तर उमेश याने सरळ सांगितलं, “माझ्या घरातल्या लोकांनाही माहीत होतं. माझे उषाबरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिले गेले आहे. कविता आणि वरुण ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणचे भाडे मला आता परवडत नाही म्हणून मी माझ्या घरात त्यांना घेऊन आलो आहे. तुमची मुलगी तिच्या सोबत राहू शकते” असं उमेश म्हणाला. “पण माझे तिच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध असणार नाही.”
घरातल्या लोकांना कविता ही पसंत नव्हती म्हणून त्यांनी जबरदस्तीने उषाशी लग्न करायला लावलं. मी नाईटला कामाला जातो, असं सांगून मी त्यावेळी कविताच्या घरी राहत होतो, असाही खुलासा उमेशाने केला. आपल्या मुलीची घोर फसवणूक झालेली आहे, हे उषाच्या माहेरच्या लोकांना समजले. उषाच्या माहेरच्या लोकांनी असा निर्णय घेतला की, त्यांच्या घरामध्ये उमेश याची भाची सरला हिला लग्न करून आणलेलं होतं. ती उषा हिची भावजय होती. दोघींचं लग्न एकाच वेळी झालेली होती.
सरला हिला बघायला आल्यानंतर सरलाची आई संगीता हिने उषाला आपल्या भावासाठी मागणी घातली होती. म्हणजे संगीता हिला आपल्या भावाचं पहिलं लग्न व मुलगा आहे याची कल्पना होती तरीही तिने आमच्या मुलीची फसवणूक केली, असा आरोप उषाच्या माहेरच्या लोकांनी केला व संगीताची मुलगी सरला ही त्यांच्या घरात नांदत होती, तिला कायमचं माहेरी पाठवून देण्याचा निर्णय सरलाच्या घरच्यांनी, उषाच्या माहेरच्यांनी घेतला. उषाच्या माहेरचे लोक म्हणायला लागले, “आमच्या मुलीचे आयुष्य बरबाद केले. आता तिचं पुन्हा लग्न करायचं घेतलं, तरी ते दुसऱ्या पानावरच कोणीतरी करणार आणि आमच्या मुलीचे आयुष्य संगीता आणि तिच्या घरातल्या लोकांनी बरबाद केलं म्हणून अशा घरातली मुलगी आमच्या घरात नको.” उमेश यांनी घरातल्या लोकांच्या दबावाखाली येऊन उषाशी लग्न केलं. यामध्ये कविताची त्याने फसवणूक केली.
कविताशी लग्न झालेले असताना त्याला वरुण नावाचा मुलगाही असताना उषाशी त्याने लग्न केले. उमेशने कविता, उषा व सरला या तिघांची आयुष्य दबावाखाली घेतलेल्या निर्णयाने उद्ध्वस्त केली. आपली भाची सरला ही सावत्र वडिलांकडे राहत होती आणि आता ती लग्न करून योग्य ठिकाणी गेली आहे, याचाही विचार त्याने केला नाही. आता पुन्हा एकदा सरला हिला आपल्या सावत्र वडिलांकडे येऊन राहावं लागणार होतं. सरला हिचा संसार व्यवस्थित चाललेला होता, पण सरलाच्या नवऱ्याने आपल्या बहिणीवर झालेला अन्याय सहन झाल्याने त्यांनीही सरलाला सोडून दिलं. तीन महिलांचं आयुष्य अशा प्रकारे बरबाद झालं.
(सत्यघटनेवर आधारित)