‘मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण’ या धारणेने शिक्षणाला प्रोत्साहन दिले गेले; परंतु महिलांची बिघडलेली दिशा पाहून संस्कार देण्यात कमी पडलो, असे वाटते. जो विषय घरचे हाताळू शकत नाहीत, ते विषय शाळेत हाताळले गेले पाहिजेत.
- विशेष : सुरक्षा घोसाळकर
अजूनही कित्येकांना बालभारतीचे पुस्तक आठवले की, बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून जायला होते. त्यातली बडबड गीते, गोष्टी बालमनावर हसत खेळत नकळतपणे संस्कार करण्याचे काम करायचे. बालपणीच्या राजपुत्र आणि राजकुमारीच्या कथांमधला बेडूक आठवतोय? जो राजकुमारीच्या पहिल्या प्रेमाच्या चुंबनाने शापित राजकुमाराला मानवी रूपात परत येणारा. मग आताच्या आधुनिक सतत बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आधुनिक संस्कृतीचा कोणताही प्रकार अंगीकारण्याची क्रेझ असलेल्या राजकुमारी राजकुमाराचे परिवर्तन राक्षसी प्रवृत्तीमध्ये का होत आहे? याचा गांभीर्याने विचार करून शैक्षणिक, सामाजिक व कायदेविषयक बदल होणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या सोशल मीडिया, कथा, चित्रपट आणि विशेषतः मालिकांनी सगळच रोमँटिक व रोमांचक केले आहे. माहितीचा अभाव, गोष्टीचे पूर्ण ज्ञान नसताना प्रयोग म्हणून प्रेम करणे, प्रेमाची, नाते संबंधांची समज अपरिपक्व असल्याने ब्लाइंड डेटमुळे दुर्दैवी अपघात होत असलेल्या विकृत घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.
रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध होय. भावनिकदृष्ट्या कमकुवत असल्याने एखाद्याबद्दल आकर्षण वाटून प्रेमात पडणाऱ्यांना नाते म्हणजे काय? हे जाणून घेण्याची गरज आहे. कमिटेड रिलेशनशिप म्हणजेच वचनबद्ध नातेसंबंध. ज्यात आपल्या जोडीदाराला जीवनभर एकमेकांसोबत राहण्याचे एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिलेले असते. १८ वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती मुलगा किंवा मुलगी किंवा समलैंगिक जोडीदारासोबत स्वतःच्या संमतीने लग्न न करता एकत्र राहण्याच्या पद्धतीला लिव्ह इन रिलेशनशिप हे गोंडस नाव दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या नात्यासंदर्भात २०१३ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. लिव्ह इनच्या कायदेशीर मान्यतेनुसार दोघांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. रिलेशनशिपमध्ये मुलाचा जन्म झाला, तर तो वैध ठरतो. नाते जपताना मानसिक, वैचारिक, भावनिक आणि सामाजिक परिणाम लक्षात ठेवून आर्थिक स्थिती सुधारणे अभिप्रेत आहे; परंतु नियम न पाळणे, नैतिक जबाबदारी न घेणे हेच निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ आहे. तसे न केल्यास त्याचे टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे विषारी तसेच त्रासदायी नातेसंबंध, ज्यात राहून फक्त मनस्ताप सहन करावा लागत असेल असे रूपांतर होते. त्यासाठी शालेय शिक्षणात शरीरधर्माचे ज्ञान मुला-मुलींना देणे महत्त्वाचे आहे. मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण या धारणेने शिक्षणाला प्रोत्साहन दिले गेले; परंतु महिलांची बिघडलेली दिशा पाहून संस्कार देण्यात कमी पडलो, असे वाटते.
जो विषय घरचे लोक हाताळू शकत नाहीत, ते विषय शाळेत हाताळले गेले पाहिजेत. प्रत्येकाला गरज असते, ती प्रेमाची व विश्वासाची. विद्यार्थी हा माझा पाल्य आहे, असे समजून वयात येणाऱ्या मुलांना नजरेतून वात्सल्य देऊन त्यांच्या शंकांचे निरसन वास्तवाचे भान ठेवून नियंत्रण कसे ठेवावे, याचे ज्ञान देणे महत्त्वाचे आहे. याकरिता वयात आलेल्या मुलांच्या पालकांचे वर्षातून कमीतकमी ४ वेळा प्रबोधन वर्ग घेतलेच पाहिजेत. मुलांचे प्रशिक्षण जितके महत्त्वाचे आहे. त्याच्या दहापट जास्त पालकांचे प्रबोधन होणे नितांत गरजेचे आहे.
संगणकाच्या युगात आधुनिक क्रांती झाली. मर्यादेपेक्षा जास्त पैसा मिळायला लागला. माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील, एवढी मेहनत करून आत्मियतेने पैसे कमवणाऱ्या व्यक्ती इतिहासजमा झाल्या. टेलिकम्युनिकेशन वाढले; परंतु कुटूंबातील अंतर्गत कम्युनिकेशनचे काय? कमविणारी मुलेमुली पैशाला सर्वस्व मानून आता मला कोणाची गरज नाही, असे मानून कुटुंबाला नगण्य स्थान देतात. त्यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त व्हायला लागली; परंतु देहधर्मासाठी उच्चशिक्षित कुटुंबामध्ये लिव्ह इन संस्कृती जन्माला आली.
भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. कुटुंब संस्कृतीमध्ये एकमेकांची काळजी घेणे ही भारतीय परंपरा आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या शिक्षितांनीच याला छेद देत आपली संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम केले. मानवाची सवय आहे झाकून ठेवले की वाकून पाहायचेच. त्यामुळे शरीरसुखाची उत्सुकता वाढून पैसे हातात असल्यामुळे मजबुती मिळाली. एकमेकांची जबाबदारी टाळणे, समाजमान्यतेने एकत्र न आल्याने एकमेकांच्या वर्तनावर अंकुश न राहिल्याने वादाचे प्रसंग उद्भवतात. त्याचे रूपांतर निर्घृण हत्येत झालेले पाहायला मिळते. विभक्त कुटुंबपद्धतीप्रमाणेच फ्लॕट संस्कृतीमध्ये शेजारच्या व्यक्तींशी संपर्क नसल्यामुळे धोका वाढला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपसारखे बहुमताने कायदे करणाऱ्यांनी या घटनांची भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा कालावधी लांबला, तर त्याची तीव्रता कमी होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसावर वचक बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी गुन्ह्याची तीव्रता पाहून मानवी देहाला इजा करणाऱ्याला, लैंगिकतेच्या प्रवृत्तीला सजा देण्याची पद्धत अमलात आणली पाहिजे. गुन्हेगाराला कारागृहात फुकटचे पोसून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना वेठीस धरण्यापेक्षा कमीतकमी कालावधीत वेळप्रसंगी जाहीर शिक्षा करणे यासारखे कायद्यात बदल होणे आवश्यक आहेत. या न्याय प्रक्रियेमध्ये जोपर्यंत बदल होत नाहीत, तोपर्यंत सर्वांनी एकत्रितपणे सांविधानिक मार्गाने उठाव करायलाच हवा. नाही, तर हा वणवा आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.
लहान बालक, कन्या, महिला, वृद्ध यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे आता कायदेमंडळाने मान्य करावयास हवे. विविध टीव्ही मालिका, चित्रपट यामधून गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या घटना प्रदर्शित करण्यास सेन्साॅर बोर्डाने लाचखोरीने मान्यता देता कामा नये. गुन्हेगारीचे हे आधुनिक प्रकार याच माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सरकारने याप्रकरणी कडक पाऊले तत्काळ उचलली पाहिजेत. मग ते सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. लिव्ह इन रिलेशनशिप या घटनेकडे पाहता महिलांसाठी सुरक्षितता काय? कायद्यात सुधारणा करावी, अशी जाहीर मागणी सर्व जनतेने केली पाहिजे.