महेश पांचाळ : गोलमाल
कोरोनाच्या संकटकाळात जगभर लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरात बसण्याची वेळ आाली होती. यावेळी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याने जगायचे कसे? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. त्या कटू आठवणीही आज नकोशा वाटतात. तरीही अनेकांचे संसार पुन्हा सावरले. काहीही अर्धा पगाराची नोकरी पत्करली, तर काहीही मिळेल तो जॉब स्वीकारला. मात्र या काळात एका तरुणाने पैसे मिळविण्याची वेगळीच वाट धरली. गेले तीन वर्षे तो बिनदिक्कतपणे हा प्रकार करत होता आणि त्यातून पैसेही मिळवत होता; परंतु अखेर मुंबई पोलिसांच्या तो जाळ्यात सापडला. लातूरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या अजय मुंडे या २५ वर्षीय तरुणाच्या गुन्ह्याची ही कथा आहे.
गेल्या काही वर्षांपासून महिलांही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येतात. अजय फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. त्याचबरोबर महिलेच्या फ्रेंडलिस्टमधील आणखी काही महिला असतील, त्यांनाही तो मेसेज करायचा. मेसेंजरवर अजयकडून एक लिंक पाठवली जात असे. त्या लिंकद्वारे संबंधित महिलेची माहिती भरण्यास तो सांगत असे. त्यानंतर आपोआप मेसेज केलेल्या महिलेचे फेसबुक अकाऊंट हॅक तोच करत असे. फेसबुक हॅक झाल्यानंतर संबंधित महिलेला तिचे फोटो पॉर्न साइटवर अपलोड झाले आहेत. तुमचा फोटो, व्हीडिओ पॉर्न साइट्सवर व्हायरल झाल्याचे सांगून त्या महिलेला भीती दाखवत असे. हा सगळा प्रकार ऐकताच क्षणी महिला हादरून जात होत्या. त्यानंतर अजयकडून त्या महिलेला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याचे आश्वासन दिले जात असे. ‘एक अॅप आहे, त्यातून ते फोटो पॉर्न साइटवरून काढता येतात, याची खात्री अजय महिलेला द्यायचा. पण हे अॅप घेण्यासाठी किमान ५ ते ७ हजार रुपयांचे रिचार्ज करावे लागेल’, असे अजयकडून संबंधित महिलेला सांगितले जात असे. त्या महिलांना धीर देण्याचे काम तो मेसेजवरून करत होता. फोटो आणि व्हीडिओ डिलिट करण्यासाठी व बदनामीचा प्रकार टाळण्यासाठी संबंधित महिलेकडून ५ ते ७ हजार रुपये अजयने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर डिजिटल अॅपद्वारे पाठवले जात होते. मात्र त्यानंतर आरोपी अजयचा संबंधित महिलेशी अजिबात संपर्क होत नव्हता.
मुंबईतील एका महिलेला अशा पद्धतीने गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी दक्षिण मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत आरोपीला शोध सुरू केला. चार दिवसांपासून मुंबईतून पोलीस पथक लातूरमध्ये ठाण मांडून बसले होते. तो तरीही पोलिसांना चकवा देत होता; परंतु कौशल्यपूर्ण तपास करताना सापळा लावून आरोपी अजय ऊर्फ विनोद मुंडे याला लातूरमधील एका गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या बँक खात्याचा तपास करताना बोगस कागदपत्रांद्वारे खाते उघडण्यात आले होते. तसेच बँकेची डिटेल पाठवण्यासाठी अजयने मुंबईतील एका महिलेचा व्हॉट्सअॅप नंबरही हॅक केला होता, असे तपासात उघड झाले. विशेष म्हणजे या आधी अजयविरोधात सिंधुदुर्गातही दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यात त्याला अटक झाली होती. जामिनावर बाहेर सुटल्यावर तो पुन्हा त्याच मोंडस ऑपरेंडीने महिलांना टार्गेट करत असल्याचे उघड झाले आहे. कारवाईदरम्यान अजयचा मोबाइल पोलिसांनी तपासला असता त्यात २४ महिलांचे फेसबुक अकाऊंट लॉगइन करत त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गेली तीन वर्षे हा आरोपी अनेक महिलांसोबत मैत्री करून त्यांच्याकडून पैसे उकाळत होता. महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. पॉर्न साइटवरील छायाचित्रे डिलिट करण्याकरिता पीडित महिलांकडून त्यांच्या खासगी भागांचे फोटोदेखील पाठवण्यास सांगितले होते. त्यांनी काही महिलांनी त्याला फोटो दिले, तर काही महिलांनी दिले नाहीत, अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. त्यामुळे इतर महिलांनी सावध राहावे. अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी त्वरित व्ही. पी. रोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तात्पर्य : सोशल मीडियाच्या अतिवापराबरोबर आता सायबर गुन्ह्यातसुद्धा दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मेसेजद्वारे येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका अन्यथा अशा प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लिंकला क्लिक करणे टाळावे.