Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखWomen safety : लोकलमध्ये महिला सुरक्षा महत्त्वाची

Women safety : लोकलमध्ये महिला सुरक्षा महत्त्वाची

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही सर्वदृष्टीने सुरक्षित मानली जाते. मुंबईत रात्री – अपरात्री कितीही वाजले तरीही एकटी – दुकटी महिला लोकल ट्रेनमध्ये बिनधास्त प्रवास करू शकते अशी ख्याती या शहराची असून सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीसही तैनात असतात. मात्र, एका अप्रिय घटनेमुळे लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षे संदर्भात सर्व बाजूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांनीही संधी साधत सरकारवर आणि गृहमंत्रालयावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये परीक्षेला निघालेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ माजली. धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याच्या या घटनेनंतर पोलिसांनी आठ तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो ४० वर्षांचा असून त्याचे नाव नवाज करीम असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. हार्बर मार्गावरील अत्यंत गजबजलेल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकांदरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास म्हणजे सारे शहर जागे असताना धावत्या लोकलमध्ये हा सर्वांसाठी मान खाली घालायला लावणारा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही गिरगावची रहिवासी असून ती नवी मुंबईत बेलापूर येथे एका परीक्षेला जात होती. पीडित तरुणी सीएसएमटी – पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लास डब्यातून प्रवास करत होती. ट्रेन सुरू होताच आरोपी डब्यात चढला तेव्हा मुलगी एकटीच प्रवास करत होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर उतरून पळ काढला. त्यानंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि आठ तासांत आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेवर विरोधकांनी गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी गृहखात्यावर निशाणा साधला.लोकलमध्ये घडलेली ही घटना अत्यंत संतापजनक आणि तेव्हढीच चिंताजनकही आहे. सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याने शहराची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. अशा घटनांमुळे मुंबई शहराच्या नावलौकिकास बट्टा लागतो. त्यातच गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

या घटनेसंदर्भात तिचा विनयभंग झाला की, बलात्कार याविषयी निरनिराळे दावे केले जात आहेत. मात्र तरीही या विद्यार्थिनीशी असे गैरवर्तन करणारा हा आरोपी विकृत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. त्याने या विद्यार्थिनीप्रमाणेच सीएसएमटी स्थानकावर आणखी पाच महिलांशी गैरवर्तन केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून समोर आले आहे. एकीकडे या प्रकरणाची चर्चा आणि तपास चालू असताना याच विकृताचे त्याच दिवशीचे सीएसएमटी स्थानकावरचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले आहे. यामध्ये या विकृताने आणखीन पाच महिलांशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, करीम हे सगळं करत असताना आसपासच्या कोणत्याही प्रवाशाने त्याला हटकले नाही. एका घटनेत करीमने मुद्दाम आपला कोपरा एका महिलेला लावल्याचे दिसत आहे. महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि गर्दीचा फायदा घेऊन तिथून काढता पाय घेणे अशा सगळ्या गोष्टी करताना दिसत होता. तो दारूच्या नशेत असल्याचे आधी समोर आले. मात्र, नव्याने समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो जाणूनबुजून हे सर्व करत असल्याचा प्रकारही आता उघड झाला आहे. त्यामुळे अशा विकृतांचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई करणे आता गरजेचे बनले आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती? याला कोण जबाबदार आहे? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. पण जर महिला डब्यात सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता.

विशेष म्हणजे पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी अन्य राज्यांतून येणाऱ्यांना या शहराबाबत, येथील लोकांबाबत, संस्कृतीबाबत असायला हवी तेव्हढी आपुलकी नसल्याने त्यांच्याकडून असे गुन्हे घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलीस यंत्रणेचा वचक असायला हवा. किमान सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही पूरक असायला हवी. कोणताही हलगर्जीपणा न करता या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तरच असे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -