रवींद्र तांबे
आपल्या मुलांच्या मनातले ओळखणारी आई आणि भविष्य घडविणाऱ्या बापाच्या मनात आजच्या घडीला एकच प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे आता करायचे काय? खरंच आजच्या काळात काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके आई-वडील सोडले तर अशा अनेक आई-वडिलांच्या मनात एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आता करायचे काय? तसेच शेवटी जगायचे की मरायचे असाही प्रश्न निर्माण होतो. तेव्हा असा प्रश्न आपल्या आई-वडिलांच्या मनात येऊ नये म्हणून प्रत्येक मुलांनी आई-वडिलांचे मनापासून पालनपोषण करणे आवश्यक आहे. याची जाणीव आजच्या मुलांना होण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.
मुले लहान असताना आई-वडील इतकी काळजी घेतात की, तीच मुले मोठी झाल्यावर आपल्या आई-वडिलांना विचारतात तुम्ही माझ्यासाठी काय केले? त्यावेळी आई-वडील मूक गिळून गप्पा बसतात. कारण रागाच्या भरात बोललो तर तेवढीच शेजाऱ्यांना ब्रेकिंग न्यूज मिळेल. नंतर चर्चा रंगायला लागतील. त्यामुळे गप्प बसणेच आई-वडील पसंत करतात. शेवटी आपल्या घरातील भांडण चव्हाट्यावर नको म्हणून आई-वडील मूक गिळून गप्प बसतात. काही मुले तर इतकी शहाणी असतात की, आई-वडील सुशिक्षित असून त्यांनी मुलांना उच्चपदावर नोकरीला लावून सुद्धा आई-वडिलांना भेटल्यानंतर छाती पुढे करीत आणि गॉगल डोक्यावर लावत रुबाबात आई-वडिलांना म्हणतात की, तुमच्यामुळे घरात भांडण होते. अशी मुले आई-वडिलांना बोलायला विसरत नाहीत. आता सांगा यात कोणाचे चुकले, नंतर बोलून झाल्यावर मागच्या पावलांनी बायकोजवळ जाऊन गप्प बसतात. मग सांगा आता आई-वडिलांनी करायचे तरी काय? कुठे जायचे? कसे जगायचे? म्हातारपणी आधार कोण देणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वाचक वर्गांनी शोधायला हवीत.
सध्याच्या युगात आई-वडिलांनी करायचे काय हा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रश्न आहे. त्यामुळे राज्य तसेच देशातील वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे हे सत्य नाकारता येणार नाही. त्यात काही आई-वडील लहानपणी मुलीपेक्षा मुलाचे अधिक लाड करीत असतात. म्हणे वंशाचा दिवा. मात्र वंशाचा दिवा मोठेपणी काय करतो हे जगाला समजले सुद्धा पाहिजे. तरच उद्याचे आई-वडील सुरक्षित राहू शकतात. असेच चालले तर त्यांना म्हातारपणीचा आधार कोण? सध्या तर वृद्धाश्रमांची वाढती संख्या लक्षात घेता लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने ठीक असले तरी शेवटचा पर्याय म्हणून जड अंत:करणाने वृद्ध लोक राहात असतात. नंतर त्यांना पश्चाताप होतो. मुलाने ज्या चुका केल्या ते त्यांना सांगायला हवे होते. त्यावेळी वडील मारतील म्हणून आई उलट खोटी माहिती नवऱ्याला सांगते. इतकेच नव्हे तर उलट सांगायची मास्तर सांगत होते की, तुमचा मुलगा अभ्यासात चांगला आहे. उद्या तुमचे नाव उज्ज्वल करेल. त्या एका वाक्यावरती मुलाच्या चुका आई माफ करते. मात्र काही चुका माफ केल्या तरी सर्वच चुका माफ करता कामा नये. योग्य वेळी योग्य शासन केलेच पाहिजे. असे सर्वच मुले करतात असे नाही; परंतु ज्यांनी आपल्याला नऊ महिने हृदयात सांभाळले त्याच मातेला शेवटी वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते हीच खरी शोकांतिका आहे. जर त्या ठिकाणी त्यांचे बरे-वाईट झाले तरी अंतिम संस्काराला येत नाहीत. तेव्हा कुणाचे चूक, कुणाचे बरोबर या वादात न पडता आपल्याला ज्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले. आज आपल्याला स्वत:च्या पायावर उभे केले त्या माझ्या लाडक्या आई-वडिलांना आता माझी गरज आहे. त्यांना आता मी जीवापलीकडे सांभाळीन असे प्रत्येक मुलांनी केले पाहिजे. तेव्हा आई-वडील हेच माझे सर्वकाही आहे. आज जो काय आहे तो त्यांच्यामुळे मी उभा आहे. याची जाणीव प्रत्येक मुलांना व्हायला पाहिजे. त्यासाठी बालपणी मुलांचे खाण्या-पिण्याचे लाड करावे. मात्र अति फाजील लाड करू नये. नंतर आई-वडिलांना आता करायचे काय? असे शेवटी म्हणण्याची वेळ येते. अशी वेळ पुढे कोणावर येऊ नये म्हणून मुलांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून द्यावी. तू कसा घडलास, तुझ्या जडणघडणीत कुणाकुणाचे योगदान आहे, त्याची त्याला जाणीव करून द्यायला हवी.
लहानाचे मोठे आई-वडिलांनी केले. ताठमानेने जगायला शिकवले, त्याच आई-वडिलांना आता तुमची गरज आहे. तुम्ही त्यांना सांभाळा अशी सांगण्याची वेळ मुलांवर येता कामा नये. तरच खऱ्या अर्थाने आई-वडिलांच्या मनात आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण होणार नाही. तरच आई-वडील अखेरचे दिवस गुण्यागोविंदाने घालवतील. त्यासाठी माणुसकी जोपासता आली पाहिजे. हेच नेमके सध्याच्या पिढीला समजत नाही. कारण माणुसकी जोपासता आली असती तर त्यांना रक्ताची नाती समजली असती. ती टिकवता आली असती. त्यामुळे आई-वडिलांच्या मनात आता करायचे काय असे म्हणण्याची वेळच आली नसती. तेव्हा आजच्या मुलांनी आपले बालपण आठवावे. आपल्याला आपल्या आई-वडिलांनी कसे घडविले याची जाणीव ठेवून म्हातारपणी उत्तम प्रकारे संगोपन करावे. म्हणजे आई-वडिलांनी आता करायचे काय? असे म्हणण्याची वेळ आई-वडिलांवर येणार नाही.