यवतमाळ: पोटदुखीमुळे (Stomach Ache) नवजात बाळ सतत रडत असल्याने त्याच्या पोटावर बिब्याचे (Marking Nut) चटके देऊन उपाय केल्याचा अघोरी प्रकार यवतमाळमध्ये (Yavatmal) उघडकीस आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्ब्याचे चटके दिल्याने त्याची प्रकृती आणखी ढासळली असून बाळाला जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत. ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार आईवडिलांनी हा अघोरी प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडून अघोरी प्रकार होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
घाटंजी तालुक्यातील पारा पीएचसीमध्ये ६ जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाला. बाळाला घरी आणण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखं रडत होतं. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या (Newborn Baby) बिब्बा गरम करुन पोटावर त्याचे चटके दिले. या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती आणखीच चिंताजनक बनली.
यानंतर बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे बाळावर उपचार केले जात आहे. बाळाला जगवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु मन हेलावणाऱ्या या प्रकारामुळे बाळाच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.