टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
छायाचित्रिकरणाचा वारसा वडिलांकडून घेऊन पुढे त्या व्यवसायात प्रथितयश प्राप्त करणारे छायाचित्रणकार (सिनेमॅटोग्राफर) म्हणजे कबीर लाल. निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांचा हुकमी एक्का असणारे हे छायाचित्रणकार आहेत. त्यांनी केलेल्या चित्रपट, गाणी यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहेत. ‘अदृश्य’ या मराठी चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले हे कलाकार असून त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा मराठी चित्रपट अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
चेन्नईमध्ये कबीर लाल यांचे बालपण गेले. त्यांचे वडील सय्यद लाल हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेले सिनेमॅटोग्राफर होते. वडिलांकडून त्यांनी छायाचित्रणाचे धडे घेतले होते. त्यांनी कोणत्याही संस्थेकडून छायाचित्रणाचे रितसर शिक्षण घेतले नाही; परंतु अनुभवाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांना ‘कर्तव्य’ या कन्नड चित्रपटासाठी स्वतंत्रपणे छायाचित्रणाची संधी मिळाली. विष्णूवर्धन हे सुपरस्टार कन्नड कलाकार त्या चित्रपटामध्ये होते. त्यानंतर तेलगू, तमिळ सिनेसृष्टीत त्यांनी काम केले.मिक्सिंग तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट (आताचे वीएफएक्स) मध्ये त्यांचा दबदबा वाढला होता. स्पेशल इफेक्टसाठी त्यांना गाण्यासाठी, जाहिरातीसाठी मुंबईला बोलावले जायचे. लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’ चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगसाठी (छायाचित्रीकरणासाठी) त्यांना मुंबईला बोलावण्यात आले. त्या चित्रपटातील सर्व गाणी कबीर लाल यांनी चित्रित केली. प्रख्यात दिग्दर्शक मुकुल एस. आनंद यांनी त्यांच्या जाहिरातीच्या स्पेशल इफेक्टसाठी त्यांना बोलावले होते. त्यांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सच्या स्पेशल इफेक्टसाठी कबीर लाल यांना बोलावले.सुभाष घई यांना त्यांचे काम आवडले व त्यांनी त्यांना ‘परदेस’ या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी दिली. कबीर लाल यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. हा त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई सिनेमॅटोग्राफरला खूप महत्त्व द्यायचे. परदेस चित्रपटातील नायिका महिमा चौधरी हिचा मेकअप कसा असावा याचं मार्गदर्शन कबीर लाल यांनी केलं होतं. ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरीसोबत अगोदर दाक्षिणात्य चित्रपटामध्ये त्यांनी काम केले होते. परदेस चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. एकदा सुभाष घई यांना ‘ताल’ चित्रपटात खऱ्या पावसात अभिनेत्री एेश्वर्या रॉयवर चित्रीकरण करावयाचे होते, कबीर लाल यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी ते चित्रीकरण केले आणि त्या पावसाच्या चित्रीकरणामध्ये ऐश्वर्या सुंदर दिसली. घईंच्या ‘यादें’ चित्रपटात करिना कपूरला सुंदर दिसण्यासाठी कबीर लाल यांनी तिला मेकअप करू नये, असा सल्ला दिला. संपूर्ण चित्रपटात ती मेकअप न करताही सुंदर दिसली. सुभाष घईंच्या ‘युवराज’ या संगीतमय चित्रपटाचे शूटिंग युरोपमध्ये -१० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये त्यांनी केले. नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर या चित्रपटासाठी केला गेला. त्यामुळे अभिनेता सलमान खाननेही त्यांचे कौतुक केले. सुभाष घईंच्या चित्रपटाचे सुंदर छायाचित्रण केल्यामुळे कबीर लाल यांना हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी ओळख मिळाली. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार हैं’ या चित्रपटाची संधीही कबीर लाल यांना मिळाली. दिग्दर्शक राकेश रोशन, अभिनेता हृतिक, अभिनेत्री अमिषा पटेल या साऱ्यांना त्यांचे काम आवडले.
मराठी चित्रपटाची छायाचित्रणाची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. ‘अदृश्य’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन मात्र त्यांनी केले. सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. पुष्कर जोग, मंजरी फडणीस, सौरभ गोखले हे कलावंत या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण कबीर लाल यांचे पुत्र शाहिद लाल यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल फिल्म इंडस्ट्रीमध्ये पडले आहे.