Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर : सुप्रिया सुळे

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर : सुप्रिया सुळे

कार्यकारी अध्यक्षा म्हणून पहिल्याच पत्रकार परिषदेत गृहखात्याच्या निष्क्रियतेवर केला हल्लाबोल


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून आज त्यांची पहिलीच पत्रकार परिषद झाली. यात काल महिलांच्या सुरक्षेसंदर्भात केलेल्या ट्विटवर त्या आज पुन्हा एकदा व्यक्त झाल्या.


"महिलांच्या विरोधात घडणार्‍या घटनांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्याला महाराष्ट्राचं गृहखातं जबाबदार आहे", असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. असं ट्विट काल सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. याचसंदर्भात आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या गृहखात्याला जबाबदार ठरवलं.





सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज त्या राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाल्या. तिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. तसेच स्वागतासाठी मोठेमोठे बॅनर्स लावण्यात आले होते.



काय होती घटना?

मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी समोर आली होती. बुधवारी सकाळी ७ वाजून २६ मिनिटांच्या CSMT-पनवेल लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात प्रवास करण्यासाठी एक २० वर्षीय विद्यार्थिनी बसली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी नवाजू करीम डब्यात चढला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनीने आरडाओरडा करत स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्नही केला. ट्रेन मस्जिद रेल्वे स्थानकावर येताच विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरून स्वतःचा बचाव केला. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाजू करीमला मस्जिद येथून ४ तासांत अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


Comments
Add Comment