Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीOnline Ticket booking App : बेस्टच्या चलो अ‍ॅपसारखे एसटीचे अ‍ॅप येणार!

Online Ticket booking App : बेस्टच्या चलो अ‍ॅपसारखे एसटीचे अ‍ॅप येणार!

ऑनलाईन तिकीट बुकिंगसह ‘ही’ सुविधाही उपलब्ध

मुंबई : राज्यातील बहुतेक प्रवाशांसाठी सोयीच्या असलेल्या एसटीचा (ST) प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. एसटीचे तिकीट काढण्यासाठी जास्त श्रम पडू नयेत, यासाठी वेबसाईटचा (website) पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र यातही अनेक समस्या उद्भवू लागल्याने आता तिकीट बुकिंगसाठी अ‍ॅप (Online Ticket Booking app) विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात दिली.

यापूर्वी वेबसाईटवरुन तिकीट काढताना अनेक समस्या येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. कधी बुकिंगच्या दरम्यानच वेबसाईट अचानक बंद होते, तर कधी प्रवाशांच्या खात्यातून पैसे कट होऊनही सीट मिळत नाही, बुक केलेल्या तिकीटाचे नंबर अनेकदा बदलतात अशा या तक्रारी होत्या. खात्यातून गेलेले पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांना खूप हेलपाटे मारावे लागत. हेच नाही तर अनेक वेळेस तिकीट काढण्यासाठी आरक्षित जागा असलेल्या बसेस उपलब्ध नसल्याची तक्रारही प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय जरी असला तरी ग्राहकांना तो सोयीचा वाटत नव्हता.

मात्र एसटी महामंडळाकडून लाँच करण्यात येणारे नवे अ‍ॅप वापरताना ग्राहकांचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफरदरम्यान कुठेही गहाळ होणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर अगदी त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल पे (Google pay), पेटीएम (Paytm), अमेझॉन पे (Amazon Pay) यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे.

याशिवाय राज्यातील ११ हजार बसमध्ये वाहन देखरेख प्रणालीचा वापर करुन प्रवाशांना त्यांनी तिकीट आरक्षित केलेली बस नेमकी कुठे आहे, हे अ‍ॅपद्वारे दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवासी बसची वाट न बघता आपली कामे आटोपून बसच्या वेळेनुसार हजर राहू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -