मुंबई: सारेगमप लिटील चॅम्प फेम मोदक आणि मॉनिटर यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) याच्या सोशल मीडियावरील पोस्टने दोघांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारण, प्रथमेशने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली देत ‘आमचं ठरलंय’ अशी कॅप्शन लिहित मुग्धा वैशंपायनसोबत (Mugdha Vaishampayan) फोटो पोस्ट केला आहे.
जसे तुम्ही सर्व अपेक्षा करत होते, त्याप्रमाणेच आता आम्ही दोघे कबुली देतो – आमचं ठरलंय! असं प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. शिवाय या पोस्टला त्याने #MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग देखील दिले आहेत. या हॅशटॅगवरून हे दोघे प्रेमात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
प्रथमेश लघाटेने मॉनिटर, अर्थात मुग्धा वैशंपायन हिच्यासोबत सूर जुळल्याची कबुली फेसबूक पोस्ट करत देखील दिली आहे, दोघे एकत्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. प्रथमेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. प्रथमेशच्या या पोस्टवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, कार्तिकी गायकवाड, सुकन्या मोने, प्रियांका बर्वे यांच्यासह अनेकांनी प्रथमेश-मुग्धाचं अभिनंदन केलं आहे. कार्तिकी गायकवाडने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ये बात… खूप खूप अभिनंदन… तर सुकन्या मोने यांनी म्हटलं आहे की, कल्पना होतीच… पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना? तर संगीतकार राहुल देशपांडे यांनी देखील दोघांचंही अभिनंदन केलं आहे.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या चाहत्यांकडूनही या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रथमेश रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा आहे. तर, मुग्धानं गायनाबरोबर नृत्याचं देखील शिक्षण घेतलं आहे. अनेकदा मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे सोशल मीडियावर एकत्र गाणी गाताना देखील दिसतात. आतापर्यंत अनेक गाणी या दोघांनी एकत्र गायली आहेत. हे दोघे नेहमी गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आजवर सर्वजण त्यांना लिटिल चॅम्प म्हणून संबोधत होते, पण आता ही मुलं मोठी झाली आहेत.