सोलापूर: राज्यातील शाळा कालपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नाराजीचं ट्वीट केलं आहे. कारण पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे पुस्तके देण्यात आलेल्या पुस्तकांत क्युआर कोड (QR code) नाहीत. रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या संकल्पनेतून शिक्षण अधिकरंजक करण्याच्या हेतूने पुस्तकांमध्ये क्युआर कोडचा समावेश करण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑडिओ आणि व्हिडिओ रुपात अभ्यासक्रम शिकता येत होते. मात्र, हेच क्यूआर कोड पुस्तकातून काढल्याने त्यावर डिसले सरांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनासारख्या परिस्थितीत ज्यावेळी शाळा बंद होत्या. त्यावेळी देखील मुलांचे शिक्षण सुरु राहीले, ते केवळ क्युआर कोड असलेल्या पाठ्यपुस्तकांमुळं असे डिसले यांनी म्हटले आहे. यासाठी सरकारनं एक धोरण निश्चित करावं. एकदा क्युआर कोड छापल्यानंतर ते परत पुस्तकातून काढले जाणार नाहीत याची खातरजमी करावी लागेल असे डिसले म्हणाले.
2016 मध्ये मी स्वतः बालभारतीला एक प्रस्ताव देऊन पुस्तकांत QR कोड समाविष्ट करण्याबाबत सुचवले होतं. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पुस्तकात हे कोड छापले होते. प्रत्येक धड्यासाठी डिजिटल कंटेंट बनवून ते QR कोड च्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचत होते. pic.twitter.com/L5zRUDoOue
— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) June 15, 2023
रणजितसिंह डिसले यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय
२०१६ मध्ये मी स्वतः बालभारतीला एक प्रस्ताव देऊन पुस्तकांत क्युआर कोड समाविष्ट करण्याबाबत सुचवले होतं. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पुस्तकात हे कोड छापले होते. प्रत्येक धड्यासाठी डिजिटल कंटेंट बनवून ते क्युआर कोड च्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचत होते, असे ट्वीट रणजितसिंह डिसले यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे एक पत्रही ट्वीट केलं आहे. दरम्यान, आता रणजितसिंह डिसले यांनी आता नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकार पुन्हा क्युआर कोडचा पुस्तकात समावेश करणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.