नवी दिल्ली (वृत्तसंस्था): संरक्षण अधिग्रहण परिषदेनं (DAC) गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सकडून प्रीडेटर एमक्यु-9बी रीपर (MQ-9B Reaper) हा सर्वात घातक ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. भारत अमेरिकेकडून असे तब्बल ३० ड्रोन खरेदी करणार आहे. भारतीय नौदलाकडे हे दोन ड्रोन आधीच भाड्यानं आहेत.
चीनच्या सीमेवर सशस्त्र दलांची देखरेख करण्यासाठी तेवढ्या सक्षम उपकरणांची गरज असल्याने हे ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा हा खरेदी करार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालयानं हिरवा कंदील दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये भेटणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भातील कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे.