नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार उडवल्यानंतर आता या वादळाचा पाकिस्तान तसेच राजस्थानलाही (Biparjoy in Rajasthan) मोठा फटका बसणार आहे. भारतीय हवामान खात्याने राजस्थानमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. तसेच उत्तरेकडील राज्यात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमार्गे पुन्हा राजस्थानात परतणार आहे. याच्या प्रभावामुळे राजस्थानात शुकवारी तसेच शनिवारी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) देण्यात आला आहे. यामुळे काही भागात अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील ९४० हून अधिक गावांना जोरदार दणका देत आणि ताशी १२ किमी वेगाने हे चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले आहे. वादळाने मोठ्या प्रमाणात सौराष्ट्र व कच्छच्या परिसरात हानी केली आहे. गुजरात आणि राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे चक्रीवादळ १५ जून रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्र किनारपट्टीवर धडकले. रात्रीच ते बाडमेरमार्गे राजस्थानला पोहोचले. आयएमडीने सांगितले की, यावेळी १२५ ते १४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत होते.
चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. येथून ९४००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. १५ जहाजे, ७ विमाने आणि एनडीआरएफची टीम येथे सज्ज आहे.
हे पण वाचा – Biparjoy cyclone: हाहाकार! बिपरजॉय धडकले
दरम्यान, बिपरजॉय या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पाऊस कमकुवत झाला आहे.
स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार, आज गुजरातच्या कच्छ प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टीसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छ भागात वाऱ्याचा वेग १०० किमी प्रतितास पेक्षा जास्त असू शकतो. ईशान्य अरबी समुद्रात उंच लाटा उसळू शकतात.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुजरात प्रदेश, केरळ, किनारी कर्नाटक, कोकण आणि गोवा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश पंजाबचा काही भाग आणि नैऋत्य राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. १६ जूनपासून नैऋत्य आणि पश्चिम राजस्थानमध्ये पावसाचा जोर वाढेल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हरियाणा, उत्तर राजस्थान, बिहारचा काही भाग, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि विदर्भ आणि मराठवाड्यात १ किंवा २ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१६ जून रोजी अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि मेघालयात १७ जूनपर्यंत वेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ जून रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.