नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करताच घराघरांतून या नोटा बाजारात दाखल झाल्या आहेत. यामुळेच एरवी यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या नागरिकांनी बहुतांश व्यवहार या नोटांनी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी नोटाबंदीच्या पहिल्या आठवड्यात याच काळातील गेल्या ४ महिन्यांच्या तुलनेत यूपीआयच्या वापरात ७%, क्रेडिट कार्ड १२% तर डेबिट कार्डच्या व्यवहारात २०% घट झाली असल्याची माहिती आरबीआयच्या अहवालातून समोर आली आहे.
९ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. आता २०००ची नोटही बाद करण्याचा निर्णय आरबीआयने ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत जाहीर केला. या नोटा लगेच बंद होणार नाहीत किंवा चलनातून बाद होणार नाहीत. त्या बँकेत जमा करून २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घेता येतील, अशी माहिती आरबीआयने दिली होती. अनेक घरांमध्येही २००० च्या नोटा होत्या. बँकेच्या रांगेत उभे राहून त्या बदलून घेण्याऐवजी खर्च करण्याकडे नागरिकांचा कल आहे. यामुळे यूपीआय व कार्डावरील व्यवहार घटल्याचे आरबीआयच्या अहवालातून दिसते.
दरम्यान, या दुसऱ्या नोटबंदीच्या काळात नोटा बदलून घेण्यापेक्षा त्या खात्यात जमा करण्यावर नागरिकांचा भर आहे. बंदीच्या पहिल्या २ आठवड्यांत चलनातील एकूण नोटांपैकी तब्बल ५० टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. त्यामुळे बँकांतील ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे.