पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी घाटातील बोगद्याचे (Kashedi Ghat) काम पूर्ण झाले असून लवकरच कशेडी बोगद्याची एक मार्गिका या महिनाअखेर वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या १० मिनिटात पार करता येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतांना पावसाळ्यात नेहमीच कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील वळणावळणाचा घाट आणि महामार्गावर दरड माती खाली येणे या घटना पावसाळ्यात घडत असतात त्यामुळे अपघातही होतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी देखील केली होती.