हैदराबाद: तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात एन्ट्री घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाने नगर जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील काही दिग्गज राजकीय नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचे नाव पुढे आले आहे. शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी नंतर पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास केलेल्या शेलार यांनी आता बीआरएसमध्ये प्रवेश घेतला आहे. याबाबत ते गुरुवारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
काही काळ वंचित बहुजन आघाडीतही रमलेले शेलार पु्न्हा राष्ट्रवादीत आले. पण २०१९च्या निवडणूकीत त्यांना भाजपचे बबनराव पाचपुते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यंदा राष्ट्रवादी त्यांना तिकीट देईल की नाही हे निश्चित नव्हते. माजी आमदार राहुल जगताप स्पर्धेत असल्याने शेलार यांना तिकीट मिळण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे शेलार बीआरएस मधील पक्ष प्रवेशासाठी हैदराबादला गेले आहेत. तेथे ते तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतील. भारत राष्ट्र समितीली नगर जिल्ह्यात घनश्याम शेलार यांच्या रुपाने तगडा शिलेदार मिळाला आहे.