Monday, December 2, 2024

नामाऽऽचा गजरऽऽऽ

ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

जगण्यासाठी काही अत्यावश्यक गोष्टी करायच्या असतात, अशीच एक गोष्ट म्हणजे ईश्वराचं नामस्मरण. ईश्वराशी एकरूप होऊन ते केलं, तर माणूस चांगल्या प्रकारे जगू शकतो. आजच्या युगाच्या भाषेत देव म्हणजे काय? तर ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ चांगली ऊर्जा! त्यासाठीच नामाचं महत्त्व आहे.

एखादी गोष्ट सरळसोट सांगितली जाते ती व्यवहारात! आणि तीच गोष्ट सुंदरतेने सांगितली जाते ती काव्यात! ज्ञानदेव हे असे सौंदर्यवादी कवी आहेत. म्हणून शिकवण देताना त्याला सुंदरतेची जोड देतात. संपूर्ण ज्ञानेश्वरी व त्यातही अठरावा अध्याय याचा अनुभव देतो. यात ईश्वराशी एकरूप व्हायला सांगितलं आहे. ते सांगताना ज्ञानदेव एक हृदयंगम ओवी लिहितात. त्या ओवीचा अर्थ असा –
‘वस्तुमात्राचे वसतिस्थान जो मी, माझी जी निर्मळ नामे, ती जगण्याकरिता तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव.’

जगण्यासाठी काही अत्यावश्यक गोष्टी करायच्या असतात, अशीच एक गोष्ट म्हणजे ईश्वराचं नामस्मरण. ईश्वराशी एकरूप होऊन ते केलं, तर माणूस चांगल्या प्रकारे जगू शकतो. हा ईश्वर कसा? तर सर्व ठिकाणी भरून राहिलेला. त्याचे नाम तुला तारून नेईल हा उपदेश ज्ञानदेव कशा प्रकारे करतात, यात त्यांची प्रतिभा आहे.

‘वाणीच्या वाटेला लाव’ या कल्पनेत अनोखेपण, नावीन्य आहे. वाणी ही वाटेल तशी जाऊ शकते. म्हणून त्या वाणीच्या वाटेला चांगले, योग्य असे वळण दे. ते वळण आहे ईश्वराच्या नामाचे. ती मूळ ओवी अशी –
मी सर्व वस्तीचें वसौटें। माझी नामें जियें चोखटें।
तियें जियावया वाटे। वाचेचिये लावीं॥ ओवी क्र. १३५८
आता अर्थ पाहूया –
वाचा म्हणजे वाणी, वाचेला वाटेला लाव. या अर्थाने आलं आहे ‘वाटे! वाचेचिये लावी।’ कशासाठी हे करायचं? तर जगण्यासाठी म्हणजे (जियावया) जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे देवाचं नाव. ही नावं कशी आहेत? तर चोखटें म्हणजे निर्मळ, पवित्र. ही नावं निर्मळ आहेत म्हणून ती घेताना भक्तही पवित्र होतो. ही नावं कोणाची? तर सर्वांच्या ठिकाणी वस्ती करणाऱ्या माझी (ईश्वराची) होय. ही ओवी आकाराने लहान, पण अर्थाने किती महान!

‘मी सर्व प्राणिमात्रांच्या वस्तीचं स्थान’ असं यात म्हटलं आहे, म्हणजे ईश्वरी अंश सर्वांच्या ठिकाणी वास करतो. प्रत्येक माणसात देवाचा असा अंश आहे.

मग या नामाचं विशेषण येतं ‘माझी निर्मळ नामे…’ ईश्वर म्हणजे सत् / चांगल्या गोष्टींचा समूह. साहजिकच ईश्वराची नामेही निर्मळ आहेत. त्या नावांच्या ठिकाणी शुद्धता, पावित्र्य आहे. आपण कोणत्याही देवाचं नाव उच्चारून पाहू या. आपल्याला पवित्रतेचा अनुभव येतो. कारण देव म्हणजे काय? तर आजच्या युगाच्या भाषेत ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ चांगली ऊर्जा! या चांगल्या ऊर्जेचा लाभ आपल्याला केव्हा मिळतो? जर ती नावं आपण तोंडाने उच्चारली तर! तोंडाने उच्चारली, तर त्यांच्या कंपनाने आपल्याला चांगल्या लहरी मिळतात. उच्चारणाऱ्याला तर मिळतात, त्याचबरोबर ती ऐकणाऱ्याला, संपूर्ण परिसराला लाभ मिळतो.

अशी ही पवित्र नावं ‘तू आपल्या वाणीच्या वाटेला लाव’ यात असा अर्थ दडलेला आहे की, हे आपसूक घडणार नाही. आपली वाचा किंवा वाणी ही माणूस म्हणून मिळालेली देणगी आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत ही वाणी वापरली जाते. या वाणीचा वापर कसाही होऊ शकतो – चांगल्या, किंवा वाईट कारणासाठी वाईट गोष्टी सहज होतात, पण चांगली गोष्ट प्रयत्नपूर्वक करावी लागते. ‘म्हणून माझी नाव तू वाणीच्या वाटेला लाव’ असं यात म्हटलं आहे.

कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत माणसाला तारून नेणाऱ्या नामाचं महत्त्व ज्ञानदेव किती सहजसुंदरपणे सांगतात.

अशा अलौकिक ज्ञानदेवांना सविनय प्रणाम!
([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -