मीरा रोड: ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘वागळे की दुनिया’ अशा कॉमेडी शोमध्ये लहान लहान भूमिका करणाऱ्या अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी वेळीच पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. लिव्ह-इन पार्टनरबरोबर झालेल्या वादानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तीर्थानंदने दिली होती. या संपूर्ण प्रकरणावर त्याची लिव्ह- इन पार्टनर म्हणजेच गर्लफ्रेंडने प्रतिक्रिया दिली आहे.
“गर्लफ्रेंड आपला छळ करत आहे. मला तिच्यापासून वेगळं व्हायचं होतं. पण, तिने मला धमक्या देण्यास सुरुवात केली, माझ्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिसांच्या भीतीने मी बरेच दिवस मी माझ्या घरी गेलो नाही, मला फूटपाथवर झोपावं लागलं. मी या गोष्टीला कंटाळलो आहे आणि त्यामुळेच मला आत्महत्या करायची इच्छा आहे,” असे आरोप तीर्थानंदने त्याच्या गर्लफ्रेंडवर केले होते.
पोलिसांनी अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्याची विचारपूस करून तिला रुग्णालयात बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, “मरू द्या त्याला, असंही मी त्याला सोडून जाणार होते.” दरम्यान, तीर्थानंद रावने यापूर्वी लॉकडाऊनमध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काम मिळत नसल्याने आर्थिक चणचण भासू लागली आणि त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आता दुसऱ्यांदा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.