Asia Cup : ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान स्पर्धा रंगणार; हायब्रिड मॉडेलचा वापर
नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ चे (Asia Cup) ठिकाण आणि तारखांचे कोडे (India vs Pakistan) अखेर सुटले आहे. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे निश्चित झाले आहे. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे, अशी घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेने केली.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नसली, तरी स्पर्धेचा कालावधी समोर आला आहे. लवकर आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा होणार आहे.
टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होण्याची शक्यता आहे. आशिया चषकाचा २०२३ चा हंगाम दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी दोन संघ सुपर फोरसाठी पात्र होतील. चारमधील आघाडीचे दोन संघ फायनलला पोहचतील.
तब्बल १५ वर्षांनंतर आशिया चषक पाकिस्तानमध्ये होत आहे. २००९ मध्ये श्रीलंका संघावर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अनेक संघांनी क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. भारतामधील दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. दशकभरापासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. आशिया चषकाचे संपूर्ण आयोजन पाकिस्तानमध्ये व्हावे, यासाठी पीसीबी अडून बसले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आता हायब्रेड मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आता पाकिस्तानमध्ये चार, तर श्रीलंकामध्ये ९ सामने खेळवले जाणार आहेत.
पाकिस्तानमध्ये कोणते सामने होणार?
आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या गटातील चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. यामध्ये एका गटातील पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आणि दुसऱ्या गटातील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यांचा समावेश आहे.
श्रीलंकेत कोणते सामने होणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध नेपाळ हे सामने श्रीलंकेत ग्रुप स्टेजपासून होणार आहेत. यानंतर दोन्ही गटांतील टॉप-२ रँकिंगचे संघ सुपर-४मध्ये पोहोचतील. सुपर-४ चे सर्व सामने आणि फायनलसुद्धा श्रीलंकेत खेळवले जातील.