माझे कोकण : संतोष वायंगणकर
जून महिना सुरू झाला की, दिवसभर बरसणारा पाऊस कोकणाने अनुभवला आहे. गेली अनेक वर्षे पावसाने कधी ७ जूनला आपले आगमन चुकविले नव्हते; परंतु चार-पाच वर्षे तरी पाऊस कधीही येतो. मागील वर्षभरात पाऊस वर्षभर सुरूच होता. त्यामुळे पावसाचा असा हंगाम ठरवणेही अवघड झाले. कोकणात पावसाळा म्हणजे एक वेगळाच आनंद सोहळा असतो. कोकणात पावसाचे बरसणे हे नॉन स्टॉप असे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा पाऊस अगदी दिवाळीच्या अभ्यंगस्नानापर्यंत असतो. सप्टेंबर अखेरपर्यंत तो थांबत नव्हता. ऑक्टोबर हिट सुरू झाली की, मग वळवाचा पाऊस अधून-मधून म्हणजे केव्हाही भेटीला येणार आणि केव्हाही ‘मन का राजा’ असल्यासारखा थांबणार या अशा ‘उन्ह आणि पाऊस कोल्ह्याचा लगीन’ असं काहीस मालवणी मुलखात म्हटलं जातं. सध्या तर कोकणात कडक उन्हाळा सुरू आहे. मध्येच कधीतरी एखादी पावसाची झलक देणारी सर आली तर आली. नाहीतर घामाच्या धारा आहेतच, असं हे विचित्र वातावरण कोकणात कधीच नव्हते. या अशा विचित्र वातावरणाचा परिणाम जसा आरोग्यावर संभवतो तसा तो शेतीवरही होत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणात भात पेरणी केली जाते. भातशेतीची कामे सुरू होतात. जून-जुलै महिन्यांत कोकणातील शेतकरी शेतीत राबत असतो. कालप्रवाहातील बदलामध्ये भातशेती करण्याचे प्रमाण मधल्या कालावधीत कमी झाले होते. भात बियाणे देखील बदलली आहेत. जास्तीत-जास्त भात उत्पादन देणारी संकरित भात बियाण्यांची पेरणी केली जाते. बदलत्या जीवनशैलीत कोकणात भात आणि मासे खाणारेच अधिक होते. म्हणूनच ‘कोकणी आणि भात बोकणी’ असं म्हटलं जायचं. या सगळया बदलाचा परिणाम जाणवल्या खेरीज राहात नाही. ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम जसा आरोग्यावर संभवतो तसा तो शेतीतही होत आहे. शेतकऱ्याचे कामच थांबले आहे. भात पेरणी करण्यासाठी शेताची नांगरणी करावी लागते. कडक उन्हाळा त्यात दिवसभरात एखादी पावसाची सर आली, तर अशा वातावरणामुळे जमिनीला नांगर लागणेच अवघड आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पेरणीचे काम होऊ शकलेले नाही. आंबा, काजू बागायतींमध्येही जून महिन्यात करावयाच्या कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. पावसाचे दमदार आगमन लांबणीवर असल्याने शेतकरी चिंतातुर आहे. दिवसभरातील एखाद्या पावसाच्या सरीने धरणीमातेची तहान शमणार नाही. या अशा स्थितीने कोकणात यावर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. खरंतर यावर्षी अगदी एप्रिल-मे महिन्यांत उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडत नाही. त्या विदर्भ, मराठवाड्यात नद्यांना महापूर आले आहेत आणि कोकणात आजही रणरणत्या उन्हात पावसाची वाट पाहिली जातेय. यावर्षी महाराष्ट्रातील जनतेला ‘इंडिकेट’ तर आहेच; परंतु कोकणवासीयांना निसर्गाने खूप काही दाखवून दिले आहे. ‘कोकणात कधीच काय व्होवचा नाय. काय भीती बाळगुची गरज नाय’ अशा समजामध्ये जर आपण असेच वावरणार असू तर भविष्यात फार मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे. दुष्काळ काय असतो? पाण्यासाठी वणवण कशी करावी लागते, हे कोकणातील काही भागांना वगळता कोणालाच कधी काही झळ लागलेली नाही. त्यामुळे पाण्यासाठीची वणवण, त्याच्या वेदना सुदैवाने आपणाला कधी सोसाव्या लागल्या नाहीत; परंतु सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांतून दोन-तीन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणून शेती करताना, पाहताना जीवनसंघर्ष कसा असतो ते पाहिल्यावर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. भविष्यात आपणाला खूप सुधारणा करावी लागणार आहे. कोकणातील जनतेने आपली जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे. पाणी वापराचे योग्य त्या पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे. पुढे-पुढे हीच पाणीटंचाई फार मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. कोकणात पूर्वी धो-धो कोसळणारा पाऊस, कडाक्याची थंडी, घामाच्या धारा असणारा उन्हाळा हे सारं भविष्यात कसं आणि किती अनुभवता येईल, हे सांगणं आणि ठरवणं अवघडच आहे.