Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती‘नामातच प्रचंड शक्ती’

‘नामातच प्रचंड शक्ती’

अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात राहात नसेल किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापीही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली, तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण ‘सर्व ठिकाणी मी आहे’ ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूंच्या अंतःकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ, सिंह, साप त्याला त्रास देत नाहीत. अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली, तर तो अंगावर येत नाही. शिवाय, साधूंच्या शुद्ध अंतःकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रीतीने, संतांच्या अंतःकरणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते.

अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते. संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल. जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना ‘तुझा विसर न पडावा’ हेच मागतात. तसेच रामदासस्वामी देवाला म्हणतात, ‘तुझा योग, म्हणजे सहवास, मला नित्य घडू दे.’ ‘योग असणे’ म्हणजे दुसरे काही नसून, मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारांत भरकटते, तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणे, हीच योगशक्ती. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर सही नसेल, तर त्या हुकमाला महत्त्व नाही. साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे. नाम हे सर्व साधनांत सहीसारखे आहे. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भरात तो आपले डोके आपटून घेई. त्याला मी सांगितले, ‘रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव, आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्या वेळी त्या नामाकडे पाहा!’ आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. खरोखर, नामात किती प्रचंड शक्ती आहे! अनुभव घेऊनच पाहा. मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे. मी इथे नाही, मी तिथे नाही, मी गेलो नाही, मी जात नाही; मी फक्त एका नामातच आहे. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे-पुढे मी आहेच. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे, सत्य सांगतो, मला कसलीही अपेक्षा नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -