
आज १५ जून म्हणजेच शाळेचा पहिला दिवस! आणि जून महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. पाऊस जितका निसर्ग हिरवागार करतो तितका रस्त्यावर चिखल करण्यास कारणीभूत ठरतो. मग मुलांना शाळेत जाताना एखादं डबकं दिसलं की त्यात उडी मारण्याचा हमखास मोह होतो. पण हे आजारांचे निमंत्रण ठरल्याने ही गोष्ट पालकांच्या मात्र चिंतेचा विषय बनते. शाळेच्या पहिल्या आठवड्यातच सर्दी, पडसे अशा बारीकसारीक आजारांमुळे मग मुलांना शाळेला दांडी मारावी लागते आणि हिरमोड होतो. त्यात मुलांनी बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आणखी आजारांना निमंत्रण मिळतं. या सगळ्यापासून आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी आईबाबा नवीन छत्री, नवीन रेनकोट, गमबूट अशा सोयीसुविधा पुरवतातही, पण गरजेच्या गोष्टी करायच्याच राहून जातात आणि मुलं कशाने बरं आजारी पडली, असे प्रश्न पडतात. पण यंदाच्या पावसाळ्यात मुलं आजारी पडू नयेत यासाठी या काही साध्यासोप्या पण गरजेच्या गोष्टी करुन पाहा.
१. घर स्वच्छ ठेवा
पावसाळ्यात घराची स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बाहेरुन घरात आल्यानंतर आपला मोर्चा थेट बाथरुमकडे वळवला पाहिजे. अन्यथा दमून आलो आहे म्हणून पाच मिनिटे बसायचे ठरवले तर तेवढ्या वेळातही जंतू घरभर पसरतात. त्याच जमिनीवर मुले बसली की त्यांचा त्या जंतूशी संपर्क येतो आणि चटकन संसर्ग होतो. त्यामुळे सकाळी आणि रात्री स्वच्छ पाण्याने फरशी पुसून घ्यावी.२. पाणी साचू देऊ नका
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डबकी तयार होतात. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर अनेक आजार बळावतात. याकरता घरात कुठेही पाणी साचू देऊ नका. कुलर, भांडी आणि टबमध्ये पाणी झाकून ठेवा. अनेक दिवस पाणी न वापरता ठेवून देऊ नका, अशा पाण्यातही डासांची पैदास होण्याची शक्यता असते. वेळोवेळी पाणी स्वच्छ करा. तसेच लहान मुलांना नेहमी मच्छरदाणीत झोपवा.
३. स्वच्छ आणि कोरडे तसेच सुती कपडे घाला
पावसाचे येणे ब-याचदा निश्चित नसते. त्यामुळे मुलांना सिल्कचे कपडे घातले आणि पाऊस आला तर कपडे अंगाला चिकटतात आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. पण, सुती कपडे घातल्याने शरीराला आराम मिळतो. डासांपासून संरक्षण करण्यासाठी सुती कपडे घालणे योग्य ठरते. तसेच सुती कपड्यांचा कोणताही अपाय नाही. याचबरोबर कपडे स्वच्छ आणि कोरडे असतील याची काळजी घ्या.
४. बाहेरचे खाणे शक्य तितके टाळा
बाहेरचे खाणे टाळणे कधीही चांगले. मात्र पावसाळ्यात याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. याचे कारण म्हणजे पावसात छतावरुन गळणारे पाणी, तसेच गाड्यांमुळे उडणारा चिखल हमखास खाद्यपदार्थांवर नकळत उडतो. असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार उद्भवतात. त्यामुळे मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात साठवलेल्या अन्नामध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात. म्हणून या ऋतूत मुलांना शक्यतो घरचे अन्न शिजवलेले खाण्यासाठी द्या. तसेच हंगामी फळे मुलांना रोगांशी लढण्याची शक्ती देतात, त्यामुळे हंगामी फळे मुलांना खायला द्या.
५. संसर्गापासून दूर ठेवा
पावसात भिजणं आणि चिखलात खेळणं म्हणजे मुलांच्या आवडीचा विषय. पण अशावेळी त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम बाहेरुन आल्यावर त्यांना आंघोळ करायला सांगा. आंघोळीच्या पाण्यात जंतूनाशक लिक्विड घाला आणि शक्यतो कोमट पाणी द्या. यामुळे मुलांना संसर्गापासून दूर ठेवता येते.
या व्यतिरिक्त अन्य काही त्रास जाणवलाच तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण या गोष्टी जर कटाक्षाने पाळल्या तर आजारांना टाटा बाय बाय म्हणता येईल आणि यंदाचा पावसाळा आणि शाळेचे पहिले दिवस मनासारखे एन्जॉय करता येतील.