मुंबई: मुंबईत हार्बर मार्गावरील धावत्या लोकलमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) माहितीनुसार, बुधवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर ८ तासांत ४० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. पण महिलांच्या डब्यात त्यावेळी पोलिस कर्मचारी तैनात नसल्याने लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पीडित महिलेने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) हार्बर लाइनची लोकल पकडली. ती गिरगावात राहते व नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेसाठी जात होती. ट्रेन स्थानकावरून निघताच आरोपी महिलेच्या डब्यात शिरला. त्यावेळी हा डबा रिकामा होता. त्यानंतर संधी साधून त्याने त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार अत्याचार केला. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणीने ट्रेनमधून उतरून थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
जीआरपी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), गुन्हे शाखा व मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मशीद स्थानकाच्या आत व बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर आरोपीची ओळख पटवून दुपारी ४ च्या सुमारास त्याला अटक केली. नवाज करीम असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आरोपी मजूर असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत बलात्कारासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सामान्यतः महिलांच्या डब्यात १ पोलिस कर्मचारी तैनात राहतो. पण ही घटना घडली तेव्हा डब्यात एक वृद्ध महिला सोडली तर दुसरे कुणीही उपस्थित कुणीही नव्हते. आरोपीने वृद्धेला धमकावत तरुणीवर अत्याचार केला. लैंगिक अत्याचाराची ही घटना सकाळच्या वेळी घडली. ही वेळ पोलिसांची ड्युटी बदलण्याची होती. त्यामुळे घटना घडली त्यावेळी पोलिस कर्मचारी महिला डब्यात उपस्थित नव्हता, असे सांगितले जात आहे.