पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धमकी प्रकरणी (Sharad Pawar threat incident) एक चक्रावून टाकणारी बातमी हाती येते आहे. केवळ लग्न (Marraige) जमत नसल्यामुळे अटक करण्यात आलेल्या सागर बर्वे या तरुणाने शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती.
पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्यात. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही झाला होता. मात्र, ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती आणि सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे तपासात समोर आले आहे.
सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली असे, सागर याने पोलिसांना सांगितले. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.