पंढरीची वारी (Pandharichi Wari) हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, ते वैभव मानले जाते. आराध्यदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी समस्त वारकरी आसुसलेला असतो. हा संपूर्ण वारकरी वर्ग प्रथम आळंदीत एकवटतो. पंढरीची वारी एकट्याने नव्हे, तर सामूहिकपणे करण्याची प्रथा आहे. त्यातून वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व दिले आहे आणि ही वारी कशी करायची? तर अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने नाचत-बागडत. खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह आवरता आला नव्हता. ज्ञानदेव म्हणतात, ‘कुंचे पताकांचे भार। आले वैष्णव डिंगर। भेणे पळती यम किंकर। नामे अंबर गर्जतसे॥ अजि म्या देखिली पंढरी। नाचताती वारकरी। भार पताकांचे करी। भीमातीरी आनंद॥’. त्याच भावनेतून हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करत असतात. त्याची सुरुवात आळंदीतून होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक दाखल होतात. तसा यंदाही श्री क्षेत्र आळंदीत भक्तीचा जनसागर लोटला. इंद्रायणीचा घाट, विविध धर्मशाळा, सिद्धबेट, मंदिरे ही ठिकाणे गर्दीने व्यापली गेली होती. दिव्यांच्या प्रकाशझोतामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगली. नदी घाटावर ज्ञानेश्वरीची पारायणे सुरू होती, तर सर्वत्र हरिनामाचा अखंड गजर झाला; परंतु ज्ञानेश्वरी माऊलीच्या पालखी प्रस्थानच्या वेळी रविवारी झालेल्या प्रकारामुळे संवेदनशील मनही दुखावले. महाराष्ट्राला वारीला सुमारे चारशे वर्षांच्या परंपरेत कधी न घडलेला प्रकार घडला.
पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेने वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून सुसंस्कृत महाराष्ट्राचे मन हेलावले. याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले. विरोधी पक्षांकडून निषेधाचा सूर उमटून वारकऱ्यांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न झाला. आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली, असा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकाराबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. ‘‘या सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिसांनी लाठीमार केल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. पण ती वस्तुस्थिती नसून आळंदीत लाठीमार झालेला नाही’’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून तसेच अगदी कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होतात. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नसतो. वारकऱ्यांच्या मुखात केवळ विठ्ठलनामाचा गजर असतो. त्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणे हे अनेक वारकऱ्यांना मोठा भाग्याचा क्षण वाटतो.
रविवारीही आळंदीत मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे या वर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेऊन गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो प्रस्ताव मान्य केला होता. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले होते. सर्व मानाच्या दिंडीतील प्रत्येकी ७५ जणांनाच मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत पाठविले जात होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. काही वारकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडली आणि मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आळंदीत पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलीस आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आपल्या शरीरावर पडलेल्या लाठीचे घाव विसरून, दुसऱ्या दिवशी हाच वारकरी टाळ-मृदंगाचा ताल… ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष… अन् अभंगाच्या नादासवे पुढे सरकताना पुणेकरांनी पाहिला.
या भक्तीच्या महाप्रवाहात आणि भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत भक्तिभावात वैष्णवांच्या या महामेळ्याचे स्वागतही झाले. माऊलींची पालखी सोमवारी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. कोरोना काळात रस्त्यावर वाटसरूंना मार्ग दाखवणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांमध्ये अनेकांना विठ्ठल दिसल्याची अनुभूती आली असेल, पण त्या खाकी वर्दीतील पोलिसांनी वारकऱ्यांवर का लाठी उगारली असेल? हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकणारा आहे. शेवटी विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेला भाबडा वारकरी लाठीमारीचा प्रकार विसरून गेला; परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिस्तीचे रिंगण पाळत पुढे वारकऱ्यांनाच मार्गस्थ व्हावे लागणार आहे.