
महिनाभरात २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार
नवी दिल्ली : जुलै महिन्यात भारतीय संघ वैस्ट इंडिज दौऱ्यावर (India West Indies Tour) जाणार असून तेथे या दोन संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने नुकतेच या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. युवा खेळाडूंना या मालिकांमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. हा कसोटी सामना ११ जूनला संपला. त्यानंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभराचा ब्रेक मिळाला आहे. १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला डॉमिनिका येथे सुरुवात होणार आहे.
दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. २७ जुलैला पहिला एकदिवसीय सामना होईल.
दुसरा एकदिवसीय सामना २९ जुलैला बार्बाडोसमध्ये खेळवला जाईल. तर तिसरा एकदिवसीय सामना १ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल.
त्यानंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दुसरा टी-२० सामना ६ ऑगस्टला गयानामध्ये, तिसरा टी-२० सामना ८ ऑगस्टला गयानामध्ये, चौथा आणि पाचवा टी-२० सामना अनुक्रमे १२ व १३ ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल.