महाराष्ट्रातील जनतेला मोदीजी, एकनाथजी आणि देवेंद्रजींवर विश्वास : चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. महाराष्ट्राचे सद्यकालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही यात मागे नाहीत, हे आज बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधून दिसून येत आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिरातबाजी आज शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यातून एकनाथ शिंदेंची पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा दिसून येत आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषिक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे.’ पुढे म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.’
सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असं या जाहिरातीत म्हटलं आहे.
शिवसेनेने असाही दावा केला आहे की, मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३% जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे.
कोण जास्त प्रसिद्ध याचा विचार करत नाही : चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्र फडणवीसांना हा इशारा आहे का, अशा चर्चा रंगत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र या जाहिरातीवर आपली प्रतिक्रिया देत चर्चा खोट्या ठरवल्या आहेत. ते म्हणाले, कोण जास्त प्रसिद्ध आहे याचा आम्ही विचार करत नाही. कोण मोठं, कोण लहान हे भाजप-शिवसेना युतीमध्ये महत्त्वाचं नाही. २०२४ च्या निवडणुकीत जनता कोणाला पसंती देते याला जास्त महत्त्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला मोदीजी, एकनाथजी आणि देवेंद्रजींवर विश्वास आहे, असंही बावनकुळे म्हणाले.