१५ हजारांहून अधिक लोक राहणार उपस्थित
धाराशिव : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजप मिशन ४५ यशस्वी करण्यासाठी अत्यंत वेगाने हालचाली करत आहे. यात आता देवेंद्र फडणवीसदेखील १५ जूनला धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा देवेंद्र फडणवीसांकडून घेण्यात येईल. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते असे १५ हजारांहून अधिक लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत.
कृष्णा खोर्यातून मराठवाड्याला पाणी देण्यासंदर्भातल्या ११ हजार कोटी रुपये रुपयांच्या एका प्रकल्पाबाबबत राज्य कॅबिनेटने निर्णय घेतला होता. त्यातील काही निधीची तरतूद झालेली आहे. त्यामुळे या सभेदरम्यान त्या निधीची घोषणा आणि प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. मोदी @९ (Modi@9) अभियानांतर्गत देशभरात आयोजित केलेल्या ५१ सभांपैकी ही एक मोठी सभा असणार आहे. या प्रकल्पासोबतच येथील मेडिकल कॉलेज, रेल्वेचे प्रश्न यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघात सध्या उमराजी निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. भाजपसाठी आम्ही एकही जागा सोडणार नाही, असं वक्तव्यं त्यांनी केलं होतं. त्यामुळे या जागेत आता भाजपचं निवडून येणं प्रतिष्ठेची बाब ठरणार आहे.
नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर आठच दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शुक्रवारी नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यामधल्या काळातही आता देवेंद्र फडणवीस सभा घेण्यासाठी सज्ज आहेत. ज्या भागांमध्ये आपली शक्ती कमी पडते आहे, ती वाढवण्याची भाजपची रणनीती आहे, त्याच दृष्टीने या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.