सिमेंटच्या पत्र्यामुळे उष्णता वाढल्याने आरोग्यास धोका
-
बाळासाहेब भालेराव
मुरबाड : पूर्वी ग्रामीण भागात कौलारू छत (Koularu roof) असलेली घरे दिसायची; मात्र अलीकडे लाकूडफाटा सहजासहजी मिळत नाही. तसेच वारंवार घर दुरुस्तीसाठी येणारा खर्च आदी कारणांमुळे बारीक कौलारू छताची घरे कुणीही बांधताना दिसून येत नाही. त्यामुळे घरावरील कौले, घोणे लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
आता घरावरील कौलांच्या जागी सिमेंटचे पत्रा सीट व लोखंडाच्या पत्र्याचे सीटचा वापर करून घर बांधत आहेत. पूर्वी धाब्याची घर असायची. त्यानंतर शोध पुढे लागत गेल्यानंतर नळीदार कौलांचा उगम होऊन वापर होऊ लागला. त्यानंतर चपट्या आयात आकारामध्ये कौलांचा वापर होऊ लागला व त्यानंतर नक्षीदार कौल हे बाजारात उपलब्ध झाल्याने त्याचा वापर घराच्या छतावर होत असे. कौल मातीपासून बनवून हे भट्टीमध्ये भाजल्याने त्यांचा टिकाऊपणा व कमी प्रमाणात पाझरत असल्याने छतावर त्यांचा वापर सुरू झाला. कौल वापरल्याने घरातील राहणाऱ्या लोकांना उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात बचाव होऊन घर हे थंड राहत असे व मातीच्या कौलामधून उन्हाच्या तापमानाने कोणत्याही प्रकारचा घातक वायू त्यातून बाहेर पडत नसल्याने कौलारू घरातील लोकांचे राहणीमान देखील सुदृढ होऊन आरोग्यासाठी लाभ होत होता.
परंतु काळाच्या बदलत्या स्वरूपाने प्रगतीच्या वाटेने पाऊल पडत असताना सिमेंट पत्र्याचे बाजारात ढीग दिसल्याने व किंमतीला देखील कमी असल्याने सिमेंट पत्रे व लोखंडाचे पत्रे आजकाल घरांवरती लोक मोठ्या प्रमाणात टाकत आहेत. लोखंडी पत्र्यापासून कोणताही घातक वायू निघत नसला तरीही घरातील राहणाऱ्या लोकांना मात्र अतिशय उष्णतेचा सामना करावा लागत आहे. परंतु सिमेंटचे पत्रे वापरत असलेल्या लोकांच्या घरात उष्णता तर निर्माण होतच आहे परंतु सिमेंटच्या पत्रातून आरोग्यास हानिकारक असे कार्बन डाय-ऑक्साइडचा वायू त्यातून निघून आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
परंतु या सर्व गोष्टींकडे आता सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. आता घरावरती सिमेंट पासून बनवलेले स्लॅबचे घर तर आहेच परंतु कमी खर्चामध्ये घराच्या छतावर टाकण्यासाठी प्रामुख्याने सिमेंट पत्र्यांना लोकांची जास्त पसंती आहे.
ग्रामीण भागामध्ये आजही अनेक घरांवरती छताच्या रूपामध्ये कौल व घोणे दिसत असल्याने त्यांच्या घरातल्या उष्णतेचे तापमान हे फार कमी आहे.
१० ते १५ वर्षापूर्वी एका कौलाची किंमत-१रूपया होती. तिच किमंत आता ८ ते ९ रुपया वर गेली. तसेच एक घोणेची किंमत -१० रूपये आहे.
सध्या सिमेंट पत्रे यांचा बाजार भाव पुढीलप्रमाणे
साडेसहा फुट पत्रा – ३७० रूपये.
साडे आठ फुट पत्रा – ४७० रूपये.
दहा फुट पत्रा – ५४० रूपये.