भाईंदर (वार्ताहर) : मीरा भाईंदर शहरात आपण यांना पाहिलेत का, असा प्रश्न विचारत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा फोटो असलेले फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावले असून महापालिका आयुक्त आणि दोन आमदारांना पत्राद्वारे लवकरात लवकर एखादा कार्यक्रम आयोजित करून शंभूराजे देसाई यांना आमंत्रित करून जनतेला दर्शन घडवून देण्याची विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरात भावी मुख्यमंत्री असे फलक लावण्याची स्पर्धा सुरू झाली होती. त्यामुळे असे फलक चर्चेत आले असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदिप राणे यांनी शहरात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा फोटो असलेले आणि आपण यांना पाहिलेत का, असा मजकूर असलेले फलक लावले आहेत.
त्याचबरोबर संदिप राणे यांनी महापालिका आयुक्त, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन यांना पत्राद्वारे कळविले आहे की, पालकमंत्री शहरात कधीच न आल्यामुळे अनेक नागरिकांनी पालकमंत्री कोण आहेत, हे सुध्दा माहित नाही. शहरात शासकीय, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असतात. परंतु अशा कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती कधीच नसते. शहरात घडलेल्या गंभीर घटनेची दखल घेण्यासाठीसुध्दा ते आले नाहीत. आता एखादा कार्यक्रम आयोजित करून शंभूराजे देसाई यांना आमंत्रित करून तसेच त्यांना उपस्थित राहण्याची विनंती करून मीरा भाईंदरच्या जनतेस त्यांचे दर्शन घडवून द्यावे.