दोन अटकेत, दोन फरार
कराड : बोगस विवाह लावून इच्छूक तरुणांकडून लाखो रुपये उकळणारी टोळी (Bogus Marriage Gang) कराडमध्ये असल्याचे उघडकीस आले आहे.
Bogus Marriage Gang : या टोळीने दोन युवकांकडून सव्वाचार लाख रुपये घेतल्यानंतर बोगस विवाह लावून देऊन संबंधित युवकांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन वर्षा जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (रा. वसंतगड, ता. कराड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (दोघीही रा. इचलकरंजी – जवाहरनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवतो, अशी माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे या युवकाला मिळाली होती. त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगडमध्ये शंकर थोरात व वर्षा जाधव या दोघांची भेट घेतली. त्यावेळी दोघांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरे याच्याकडून २ लाख २५ हजार रुपये घेतले. यानंतर १५ एप्रिल रोजी त्यांना पूजा पाटील ही मुलगी दाखवली. मुलगी पसंद असल्याचे सांगितल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये त्या दोघांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी पूजा हिची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले. दुसऱ्या दिवशी ते पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो, असे सांगून पूजाला घेऊन गेले.
दरम्यान, दोन दिवसांनी विश्रामबाग- सांगली पोलीस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती रमेश नांगरे याला मिळाली. त्यामुळे संशय आल्याने त्याने पूजा यादव हिच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पत्नी पूजा सासरी न आल्यामुळे फसवणूक झाल्याचे रमेश नांगरे याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या टोळीने अशाच प्रकारे येणके येथील युवकाचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने दोन लाख रुपये घेऊन १५ डिसेंबर २०२२ रोजी येणकेतील युवकाचा साक्षी साळुंखे या युवतीशी विवाह लावून दिला. विवाहानंतर २५ ते ३० दिवस साक्षी येणके येथे राहिली. मात्र, आजारी बहिणीला इंदापूर येथून भेटून येते, असे सांगून साक्षी गेली, ती परत आलीच नाही. त्यामुळे या युवकाचीही दोन लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.