केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेडला दोन दिवसांपूर्वी सभा झाली आणि त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शहा यांची ही सभा म्हणजे जणू लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेच, असे समजले जात आहे. कारण शहा यांच्या भाषणात जास्तीत जास्त हल्ला ठाकरे गटावर चढवला गेला. ज्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बॅटललाइन्स स्पष्ट झाल्या आहेत. ठाकरे यांनी फडणवीस यांचे फोन न घेण्याचे कृत्य केले, त्याचा राग सर्व भाजप नेत्यांच्या मनात आहे. त्यातच ठाकरे यांनी ऐनवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद बळकावले, किंबहुना या पदासाठीच त्यांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या काँग्रेस विरोधाच्या परंपरेला तिलांजली दिली, अशी भावना लोकांमध्ये आहे तशीच ती भाजपमध्ये आहे. पित्याला दिलेल्या खऱ्या-खोट्या वचनांचे तकलादू कारण देत ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला देण्याचे सांगत स्वतःच बळकावले, यामुळे महाराष्ट्र चकित झाला आणि नंतर संतप्त झाला. मुळात शरद पवार यांनी अगोदर जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, असे सांगितले होते. पण नंतर काहीतरी चक्रे फिरली आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले. अर्थात त्यांचा हा डाव जास्त चालला नाही आणि आता त्यांच्याकडून पक्ष आणि नावही गेले.
शहा यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना जाहीर सभेतच पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री फडणवीस होतील, असे जाहीर केले आणि त्या सभेला ठाकरे स्वतः उपस्थित होते. तरीही त्यांनी त्यावेळी विरोध केला नाही, असा जोरदार टोला लगावला. अर्थात शहा यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त ठाकरे यांच्या शिवसैनिकांना ते पटत नाही. स्वतःची धोरणे सोडून मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड ठाकरे यांनी केली आणि तरीही त्यांच्या निर्णयाला ज्या काही मूठभर शिवसैनिकांनी विरोध केला नाही, ते इतरांना अंधभक्त म्हणतात. हे शिवसैनिक निष्ठावंत आणि भाजपचे अंधभक्त अशी वर्गवारी ठरवून टाकली आहे. शहा यांनी शिवसेना भाजपने संपवली नाही तर त्यांचेच लोक त्यांना या धोरणाला तिलांजली देण्याच्या कृत्यामुळे सोडून गेले, असे सांगत ठाकरे यांच्या पदरात त्यांच्या चुकीचे माप घातले. अमित शहा यांचा दौरा हा राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाचे डाव खेळले जात असताना झाला, हे विशेष महत्त्वाचे आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण, औरंगाबादचे नामांतर वगैरे मुद्द्यावर राज्यात उलटसुलट भूमिका वेगवेगळे पक्ष घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा होता. आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात केवळ शिवसेना (उबाठा) वरच हल्ला चढवला. त्यामुळे निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात प्रमुख शत्रू हाच पक्ष असणार, हे उघड झाले आहे. वास्तविक उबाठा गटाची आता ताकद नगण्य आहे. पण शहा ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचा केलेला अपमान विसरलेले नाहीत. त्यांनी आपल्या भाषणात संपूर्ण वेळ केवळ ठाकरे यांनाच लक्ष्य केले. काँग्रेसवर टीका त्यांनी उगीच तोंडी लावण्यापुरती केली. त्यांनी ठाकरे यांना काही सवालही केले, त्याची उत्तरे कधीच दिली जाणार नाहीत. उबाठा गटाकडून फार काही धोका नसतानाही शहा त्यांच्यावरच जोरदार टीका करतात, याचा अर्थ ठाकरे यांनी केलेला अपमान शहा आणि भाजपच्या जिव्हारी लागला आहे. राजकारणात असे फोन न घेणे चालत नाही, पण ठाकरे यांनी तितकी प्रगल्भता दाखवली नाही, ही रास्त भावना भाजपमध्ये आहे.
शहा यांचा हा दौरा राज्यात अकोला, कोल्हापूर आणि कित्येक ठिकाणी जे जातीय दंगे उसळले, त्या प्रवृत्तींना चोख जबाब देण्यासाठीही होता. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत आणि उत्तर प्रदेशनंतर हेच राज्य भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या राज्यात अशांतता निर्माण झाली तर ती भाजपला परवडणार नाही. महाराष्ट्र राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला भाजपला यासाठी परवडणार नाही. कारण मुंबई महाराष्ट्रात आहे आणि ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका करताना अल्पसंख्याकांना आरक्षण देणे भाजपला मान्य नाही, असे सांगत काँग्रेसला जोरदार चपराक दिली. कारण अल्पसंख्याकांना आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आजपर्यंत कायम राजकारण करत आली आहे. कर्नाटकात तर काँग्रेसला ८२ टक्के मुस्लिमांनी एकगठ्ठा मते दिल्याचे वृत्त आहे आणि राज्यातही अलीकडे धार्मिक वातावरण तंग झाले आहे. औरंगजेबच्या पोस्टवरून ठिकठिकाणी धार्मिक द्वेष भडकवण्याचे काम समाजकंटक करत आहेत आणि ते नेहमी विशिष्ट पक्षांचेच असतात. या पार्श्वभूमीवर शहा यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाच्या राजकारणावर चालणाऱ्या पक्षांनाच एकप्रकारे इशारा दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण काँग्रेसने केले, तर भाजपही जशास तसे उत्तर देईल, हे शहा यांनी बिटवीन द लाइन्स म्हणजे सांगितले. पण न सांगता अशा पद्धतीने सांगितले आहे. एकूण अमित शहा यांच्या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. आता त्यावर प्रतिक्रिया सारेच देतील आणि मग एकच धुरळा उडेल. पण त्या गदारोळात शहा यांनी उपस्थित केलेले मुद्दे अनुत्तरित राहाता कामा नयेत.