रवी शास्त्री यांचा रोहितला टोमणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांत आयसीसीची ट्रॉफी भारतीय संघाला हुलकावणी देत आहे. अशात डब्ल्यूटीसीची अंतिम फेरीही भारताने गमावली आहे. त्यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार रोहित शर्माला टोमणा मारला आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकणे हा लहान मुलांचा खेळ नसून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हे खूप सोपे वाटते, असे शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्री म्हणाले की, ‘आयसीसी ट्रॉफी जिंकणे इतके सोपे नाही, तो काय लहान मुलांचा खेळ आहे का? माही होता त्यावेळी ट्रॉफी जिंकणे सोपे होते. त्याने ते सहजरीत्या अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारताने फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे, परंतु प्रत्येक वेळी संघ जिंकण्यात अपयशी ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवून एक दशक उलटले आहे. टीम इंडियाने अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघ अनेकवेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे पण एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही.