
गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने नेणार
ठाणे : देशात घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांनंतर पोलीस प्रशासनही तितकेच तत्पर झाल्याचे दिसून येत आहे. धर्माधर्मांत तेढ वाढवण्याचे प्रकार करणा-यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला जात आहे. त्यातच पोलिसांच्या तत्परतेची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंब्रा परिसरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ४०० जणांच्या धर्मांतरप्रकरणी जबाबदार आरोपी शहानवाज मकसुद खानला ठाणे पोलिसांनी रविवारी अलिबाग येथून अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला शहानवाज हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलीसांचे पथक अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सुरुवातीला आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलद्वारे आरोपी वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याचा सुगावा लागला. पोलीस पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांना संपर्क केला. परंतु आरोपी आलिबागला पळाला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ठाणे पोलिसांचे पथक रायगड जिल्ह्यातील अलिबागला रवाना झाले. त्यांनी अलिबाग मधील लॉज, हॉटेल्स व इतर संभावित ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका लॉजमध्ये शहानवाज असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. ठाणे पोलिसांच्या पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या मदतीने शाहनवाज याला अटक केली.
आज त्याला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सांगितल्यानुसार शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. तसेच शहानवाजला पुढील तीन दिवसात गाझियाबाद स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश गाझियाबाद पोलिसांना देण्यात आले आहेत. गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने घेऊन जाणार आहेत. दरम्यान, रस्त्यात वेळोवेळी ब्रेक घेऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करावी तसेच त्याला सुरक्षित नेण्यात यावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.