Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसमुद्राला उधाण; कोकणातील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

समुद्राला उधाण; कोकणातील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

गणपतीपुळे परिसरात जाणवला सर्वाधिक फटका

रत्नागिरी : सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. समुद्राला उधाण आले असून अजस्त्र लाटांनी कोकणातील समुद्रकिनारी दाणादाण उडाली आहे. यामुळे समुद्र शांत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना बीचवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दुसरीकडे गणपतीपुळ्यात समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग दोन दिवस गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला भरतीचा फटका बसला. समुद्राच्या लाटा किना-यावर धडकल्याने छोट्या दुकानदारांना फटका बसला. अजस्त्र लाटांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी दाणादाण उडवली आहे.

‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मोसमी पाऊस रविवारी कोकणात दाखल झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वारे दाखल झाले असून पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे हलक्या सरींचा शिडकावा झाला. किनारपट्टीवर ढगांची दाटी असून, वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे. कर्नाटकातील शिवमोगा, हसनपर्यंत आणि केरळमधील श्रीहरीकोटा, तमिळनाडूतील धर्मपुरी, आसाममधील धुब्रीपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस ७ जूनला दाखल होतो. यंदा तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. केरळमध्येच तो उशिराने म्हणजे ७ जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते.

राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा वाहून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ यापूर्वी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. पण, आता चक्रीवादळाने दिशा बदलली आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. गुरुवारी, पंधरा जून रोजी दुपारी चक्रीवादळ कच्छ आणि कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ कच्छच्या वायव्येस अरबी समुद्रात ६१० किलोमीटर आहे.

दरम्यान, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पुढील ४८ तास पोषक वातावरण आहे. दोन दिवसांत संपूर्ण तळकोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांत मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहील, असा अंदाज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -