
ही दडपशाही नव्हे, लोकशाही आहे : सुप्रिया सुळे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी १० जूनला राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र उबाठा सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. 'एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का?' असा सवाल सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी मात्र 'ही लोकशाही आहे, इथे कोणलाही काहीही बोलण्याचा अधिकार' म्हणत नरमाईची भूमिका घेतली आहे.
'काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली, पण त्यात काही दम वाटत नाही. भाकरी फिरवली नसून ती आता कुठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवीन भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल', अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
यावर सुप्रिया सुळे शांतपणे म्हणाल्या, 'ही दडपशाही नव्हे, लोकशाही आहे. त्यामुळे कुणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यात गैर काय? ते त्यांचं मत आहे'. त्यामुळे महाविकास आघाडीतच फूट असली तरी सुप्रिया सुळेंनी त्यावर काहीही बोलायचे टाळले आहे.