
कागलमधील तणावसदृश वातावरणावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया
कागल : सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राज्यात दंगली होत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरमधील कागलमध्येही आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तेढ निर्माण झाल्याची घटना समोर आली होती. यातील संबंधितांना अटक करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया मांडली.
हसन मुश्रीफ म्हणाले, भीमराव पानसेंच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात २२ सरदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांकडे होते, असं म्हटलं आहे. ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती. मग २२ प्रमुख आणि मावळे यात किती मुस्लिम असतील! त्यांच्यावर विश्वास असल्याशिवाय महाराज त्यांना आपल्याकडे ठेवणार नाहीत. या मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याशी आपली लढाई झाली असेल तर औरंगजेब आपला होऊच शकत नाही. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांनी आपल्या लहान व अल्पवयीन मुलांकडे लक्ष देण्याची आणि हा इतिहास त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.
पुढे ते म्हणाले, भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतामध्ये राहिलो. भारताच्या मातीमध्ये आमची नाळ घट्ट झालेली आहे. त्यामुळे भारतीयांची भक्ती ही आपली भक्ती असली पाहिजे.