वैष्णवांच्या महामेळ्याचे पुणेकरांकडून स्वागत
पुणे ( प्रतिनिधी) : टाळ मृदंगाचा ताल…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् अभंगाच्या नादासवे पुढे सरकणारा भक्तीचा महाप्रवाह…अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे सोमवारी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात वैष्णवांच्या या महामेळ्याचे स्वागत केले.
तुकोबांची पालखी आकुर्डीहून, तर माउलींची पालखी आळंदीहून सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी अभंगाच्या तालावर डोलू, नाचू लागले. भक्तीच्या गजरात पावलागणिक उत्साह वाढत गेला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या मार्गावर आली. तोवर वाकडेवाडीतील मरिआई गेट चौक ते पाटील इस्टेट (संगमवाडी) चौकापर्यंतचा परिसर भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरलेला होता. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. साडे पाचच्या सुमारास विविधरंगी फुलांनी सजविलेला चांदीचा रथ दृष्टीपथात येताच भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत केले. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर माथा टेकवत अनेकांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. पालखी सव्वा सहाला म्हसोबा गेट चौकात, तर साडेसहाच्या आसपास तुकाराम पादुका चौकात येताच वारकऱ्यांचा उत्साह दुणावला. भक्तीच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमून गेली.
तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांना माउली भेटीची आतुरता लागलेली. नगारा झडला, माउलींच्या अश्वांच्या आगमनाने चैतन्य पसरले. त्यानंतर हरिनामाच्या गजरात साडेसहाच्या सुमारास ज्ञानेश्वर माउलींचा नितांतसुंदर पालखीरथ अवतरला अन् भाविकांच्या आनंदाने परमोच्च बिंदू गाठला. पुष्पवृष्टीने पालखीचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. सव्वा सातच्या सुमारास पालखी रथ म्हसोबा गेट चौकात, तर साडे सातच्या आसपास ज्ञानेश्वर चौकात येताच वातावरण भारले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत पुणेकरांनी पालखीचे स्वागत केले.
पालख्यांचा महासंगम….
दोन्ही पालख्यांचा महासंगम होताच वैष्णवांच्या या मेळ्याला महामेळ्याचे रूप प्राप्त झाले. वारकऱ्यांचा हा भक्तिप्रवाह फर्ग्युसन रस्तामार्गे पुढे सरकत महाप्रवाहात रुपांतरित झाला. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे मनोभावे स्वागत केले. माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.