गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
११ जून सानेगुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष…
पगारी नोकरीपेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकविण्याच्या त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले. ते मुलांचे पालक होते. तेथील मेहनतीमुळेच ते ‘साने गुरुजी’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जितका जपतोस तितकाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो! हे शब्द ‘आदर्श व्यक्तिमत्त्वाची’ ओळख करून देतात. दारावरून लाकडाची मोळी घेऊन जाणारी अस्पृश्य जातीची अशक्त वृद्धा जेव्हा तोल जाऊन खाली पडते, तेव्हा तिला कोणी स्पर्श करत नाही. आई श्यामला मदत करण्यास सांगून ‘मानवता हाच श्रेष्ठ धर्म’ हे शिकवते. ‘न उमललेल्या कळ्या तोडू नयेत, बाळाला जशी आईची तशी कळ्यांना झाडाची गरज असते.’ आज समाजात कळी उमलण्याआधीच गर्भाशयात मारल्या जातात. या आजच्या शोकांतिकेकडे त्याकाळी लक्ष वेधले. गरिबीतही, घरातल्या साध्या प्रसंगातून जीवनमूल्यांचे, स्वाभिमानाचे शिक्षण देणाऱ्या आई यशोदाच्या संगोपनात ज्या श्यामचे बालपण विकसित झाले, तो श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव साने : ‘साने गुरुजी!’
प्रसंगी कठोर होऊन श्यामला इंग्रजीसाठी दापोलीला; शिक्षण, जेवण मोफत असलेल्या औंध संस्थेत शिक्षणासाठी पाठविले. अनेक संकटे झेलत श्यामने शिक्षण पूर्ण केले.अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये नोकरीबरोबर त्या शाळेच्या वसतिगृहाची जबाबदारीही श्यामवर होती. तेथे श्याममधील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. श्यामने विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली. याच कालावधीत नोकरी चालू असतानाच श्यामने तत्त्वज्ञानाचा अभ्यास, स्वतःच्या हस्ताक्षरांतले ‘छात्रालय’ दैनिक आणि ‘विद्यार्थी’ मासिकातून विद्यार्थ्यांच्या मनावर नैतिक मूल्ये रुजवली. श्यामची शिकवण्याची पद्धत आणि त्यामागची कळकळ पाहून ते उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षकांना मिळणाऱ्या पगारी नोकरीपेक्षा मुलांना मानवतेचे धडे शिकविण्याच्या त्यांच्या आवडीमुळे ते विद्यार्थीप्रिय बनले. ते मुलांचे पालक होते. मुलांचेही त्यांच्यावर प्रेम होते. तेथील मेहनतीमुळेच ते ‘साने गुरुजी’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रभाव साने गुरुजींवर होता. त्या विचाराला अनुसरून खादीचाच वापर, मैला वाहणे, ग्रामस्वच्छता अशी अनेक कामे केली. अंमळनेरला नोकरी चालू असतानाच १९३० मध्ये महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाच्या वेळी गुरुजीना ना. गोखल्यांच्या भाषणांतील कोळ्याची गोष्ट आठवली.
समुद्राची गाज ऐकू आली की, कोळ्याला घरी राहवत नसते. लगेच तो आपली होडी हाकतो. तद्वत ना. गोखंल्याप्रमाणे त्या दांडीयात्रेत, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी साने गुरुजींनी नोकरीचा राजीनामा दिला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत राहून, खेड्याखेड्यांत सभा घेऊन साने गुरुजींनी स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार केला.
वेगवेगळ्या आंदोलनांतील सहभागामुळे साने गुरुजींना आठ वेळा अटक झाली. धुळे, त्रिचनापल्ली, येरवडा, नाशिक, जळगाव या तुरुंगात ते अनेक महिने होते. तुरुंग हे त्यांचे विद्यापीठ होते. सश्रम शिक्षा भोगून रात्री साने गुरुजी वाचन, अभ्यास करीत. नाशिक तुरुंगात सर्व भाषेत भाषांतरित झालेले अजरामर ‘श्यामची आई’, धुळे तुरुंगात आचार्य विनोबा भाव्यांच्या गीता प्रवचनावर ‘गीताई’ ही पुस्तके लिहिली. बंगलोरच्या तुरुंगात कवी ‘कुटलांच्या’ महाकाव्याचे तसेच बाहेरही लहान मुलांसाठी तमिळ, बंगाली, फ्रेंच, इंग्रजी अशा अनेक पुस्तकांचे मराठीत अनुवादित केले. तुरुंगात असताना साने गुरुजी सत्याग्रही तरुणांना काही पाश्चिमात्य ग्रंथालयातील गोष्टी सांगत असत. ते सत्याग्रही गुरुजींना म्हणाले, ‘आम्हांला सांगत असलेल्या गोष्टी तुम्ही लिहून काढा. आम्ही वाचू नि दुसऱ्यांना वाचून दाखवू.’
त्रिचनापल्लीच्या तुरुंगात दक्षिणेकडील भाषेचा संबंध आल्याने, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने परप्रांतातल्या वेगवेगळ्या भारतीय भाषा शिकण्याचे महत्त्व ओळखले. प्रत्येक भारतीयांनी एक तरी भाषा शिकावी त्यासाठी येरवडाच्या तुरुंगात त्यांनी ७/८ जणांना बंगाली शिकविले. चालीरीती समजून घेल्यास, भेदभाव दूर होऊन, बंधुत्वाच्या वातावरणात भारत जोडला जाईल. यासाठी साने गुरुजीनी “आंतरभारती चळवळ” उभारू या, हा मनोदय व्यक्त केला. विशेषतः लहान मुलांसाठी, तरुणांसाठी कौटुंबिक देवाण-घेवाण व्हावी, जी आज लग्नात पाहतो.
साने गुरुजींचे भारतीय संस्कृतीवर, हिंदू धर्मावर, आईवर आणि लहान मुलांवर अतिशय प्रेम! साऱ्या लेखात मानवतेविषयी तळमळ दिसून येते. “करी जो मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे.” कुमारांसाठी आदर्श पिढी घडविण्यासाठी, मनोरंजनातून मुलांवर संस्कार करणारे विपुल साहित्य लिहिले. अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” या गाण्याच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या ‘पत्री’ या देशभक्तीपर कवितासंग्रह जप्त केला गेला.
स्थापन आणि संपादित केलेले बौद्धिक विचार प्रक्रियेच्या ‘साधना’ मासिकातून साने गुरुजींनी आपली पुतणी सुधाताई हिला उद्देशून, पण तरुणांसाठी ‘सुंदर पत्रे’ लिहीत होते. सारा देश हिंडून, शेकडो ग्रंथ चाळून, साध्या भाषेत जगभरची स्थिती, तेथील अनेक प्रसिद्ध माणसांची ओळख करून दिली. मुलांसाठी ‘शाळा तेथे कथामाला’ या साने गुरुजींच्या उपक्रमाची आज गरज आहे.
पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश मिळावा, त्या भूमिकेला पाठिंबा मिळावा त्यासाठी चार महिने गुरुजींनी महाराष्ट्रभर प्रवास केला, उपोषण केले, शेवटी दलित समाजासाठी पंढरपूरचे मंदिर उघडे झाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले.
आयुष्याची शेवटची वर्षे साने गुरुजी आपल्या मूळ गावी राहिले. राहते घर देशाला अर्पण केले. आज एकाही पुस्तकाचे हक्क साने कुटुंबाकडे नाहीत. स्वातंत्र्यानंतर बदललेली स्थिती, समाजातील विषमता त्याच्या संवेदनशील मनाला टोचत होती. गांधी हत्येचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी उपोषण केले. पण शांती मिळाली नाही. विचाराच्या आणि आचरणाच्या पातळीवर कुठेही तडजोड करणे त्यांना शक्य नव्हतं. आप्तस्वकीयही निधन पावले होते. या निराशेत ११ जून १९५० ला त्याचे निधन झाले.
मृत्यूनंतरही ‘भारताचे राष्ट्रीय शिक्षक’ म्हणून ओळखले जातात ते साने गुरुजी! ग. प्र. प्रधान म्हणतात, ‘साने गुरुजींजवळ शिकणे हा एक अपूर्व अनुभव आहे.’ राष्ट्र सेवादलात मुले गोष्टीतल्या त्यांच्या नवनव्या विचारांनी भारावून जात होते.
साने गुरुजी हे दोन शब्द जवळ आले की, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात शाळेच्या प्रार्थनेचे स्वर गुंफतात. “आता उठवू सारे रान’, ‘बलसागर भारत होवो’, “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हेच साने गुरुजींच्या जीवनाचे सार होते. असा हा ‘श्याम ते साने गुरुजी प्रवास’! त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!