Saturday, December 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसेन्सिबल ‘मोस्टली सेन’

सेन्सिबल ‘मोस्टली सेन’

मुक्तहस्त : अश्विनी पारकर

मराठमोळी यूट्यूबर प्राजक्ता कोळी ‘मोस्टली सेन’ या यूट्यूब चॅनलद्वारे जगभरात पोहोचली. रेडिओ जॉकी म्हणून नशीब आजमावायला गेलेल्या प्राजक्ताचं ते स्वप्न, तर पूर्ण झाले नाही. पण आपल्या सर्वांना भारतातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्ये तगडा मराठी चेहरा मिळाला. आज तिच्या यूट्यूब चॅनलला ६.९५ मिलियन सबस्क्राईबर्स, तर इन्स्टाग्रामवर ७.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. लोकांना तर ती आवडते, पण मराठमोळ्या प्राजक्ताला काय आवडतं, याबद्दल तिच्याशी केलेली खास बातचीत…

प्राजक्ता तुझे मराठीमधील आवडते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कोण? तू कोणाला जास्त फॉलो करतेस?

निपुण धर्माधिकारी माझे ‘मिसमॅच’चे दिग्दर्शक होते. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप खास आहेत. सारंगसोबत माझी मैत्री मिथिला पालकरमुळे झाली. पॉला, अमेय तसेच भाडिपाची संपूर्ण टीम यांच्यासोबत कुटुंबातील जवळच्या माणसाशी जसं नातं असतं तसंच आहे. त्यांचं काम पाहायला खूप मजा येते. मी ठाण्याची आहे म्हणून नील, करण सोनावणे, सिद्धार्थ सरफरे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मला आवडतात. त्यांना पाहायला जास्त आवडतं.

मराठी सोशल मीडियामध्ये काय प्रोजेक्ट्स करायचे आहेत?
मराठी सोशल मीडियासाठी दोन नवीन प्रोजेक्ट्स करायचा माझा विचार आहे. त्याचं लिखाण सध्या सुरू आहे. पण मराठीतून लिहिणं हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. त्यामुळे त्याबद्दल काम सुरू आहे. पण थोडा वेळ लागेल. ज्यावेळी हे पूर्ण होईल, त्यावेळीच मी याबद्दल अधिक सविस्तर बोलू शकेन.

कोळी भाषा तुला बोलता येते का? कोळी भाषेच्या प्रेमाविषयी काय सांगशील?
कोळी भाषा मला समजते, पण बोलता येत नाही. विनायक माळी जे कोळी भाषेतील यूट्यूबर आहेत यांना एकदा एका सेटवर भेटलेले. तेव्हा त्यांच्याशी छान मैत्री झालेली.

सोशल मीडिया स्टार म्हणून सोशल मीडियावर असताना तुला कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागला का? तुझे सेलिब्रिटींचे केले जाणारे ट्रोलिंग यावर काय मत आहे?
जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी म्हणून वावरता, तेव्हा बरेचदा तुम्हाला बऱ्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. पण मी ते पॉझिटिव्हली घेते. मी आज जे काही आहे ते माझ्या माय-बाप प्रेक्षकांमुळे आहे. त्यामुळे त्यांना जर काही माझ्या कंटेटमध्ये (विषय, कथा, सादरीकरण) दोष वाटला आणि त्यांनी तशी कमेंट केली, तर मी त्याकडे लक्ष देते. पण जर कोणी कशाचा काहीही आधार नसताना चुकीच्या कमेंट्स करत असेल, तर मी त्याकडे दुर्लक्ष करते.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना तू काय संदेश देशील?
सोशल मीडियाचा वापर आपण कसा करतो यावर सर्व अवलंबून आहे. सोशल मीडिया वाईट आहे, असं म्हणण्यापेक्षा आपण त्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. तुमच्याकडे सोशल मीडियाने अनेक पर्याय दिले आहेत. मला जर असं वाटतं की, एखादी गोष्ट माझ्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच काही सकारात्मक देत नाहीये, तर म्यूट, रिस्ट्रिक्ट, ब्लॉकचा पर्याय असतो. तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर जबाबदारीने केला, तर ‘सोशल मीडिया डिटॉक्स’ची वैगरे तुम्हाला गरज पडणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुम्ही एक स्वत:ला ‘एनरिच’ (स्वत:मध्ये सकारात्मक बदल) करण्यासाठी एक ‘टूल’ म्हणून केला, तर ते
कधीही तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -