‘प्यार ज़िंदगी है’ भाग-१

पुस्तक परीक्षण : अनिता पाध्ये


ज्येष्ठ सिनेपत्रकार व लोकप्रिय लेखिका अनिता पाध्ये यांचे नवे पुस्तक ‘प्यार ज़िंदगी है’ हे नुकतेच प्रकाशित झाले आहे. १२ लोकप्रिय हिंदी रोमँटिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास लेखिकेने सादर केला आहे. या पुस्तकात चित्रपटाच्या निर्मितीसोबत अनेक खरेखुरे रोचक किस्से वाचायला मिळतात. सदर पुस्तकातील ‘बॉबी’ चित्रपटाच्या निर्मिती प्रवासातील हा काही भाग...


एका दुपारी नेहमीप्रमाणे राज कपूर आपल्या कॉटेजमध्ये आले. त्यांच्या रूममध्ये भारतीय बैठक होती. त्याच्यासमोर एक टेबल होतं. त्यावर काही पुस्तक ठेवली होती. त्यातलं आर्चिज कॉमिक्सचं एक पुस्तक उचलून त्यातील एक कथा ते मन लावून वाचू लागले. ती कथा होती, मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका किशोरवयीन मुलाची. आपला मुलगा प्रेमात पडला आहे, ही गोष्ट त्या मुलाच्या वडिलांना समजते, तेव्हा ते त्याला विचारतात, ‘हे तुझं प्रेमात पडायचं, प्रेम करायचं वय आहे?’ ‘यू आर टू ओल्ड टू फॉल इन लव्ह?’



त्या मुलाच्या वडिलांचं ते वाक्य राज कपूर यांच्या मनात घोळत राहिलं... ‘यू आर टू ओल्ड टू फॉल
इन लव्ह?’



आणि त्यांना आपल्या नव्या चित्रपटाचं कथाबीज सापडलं. कॉलेज विश्वात पदार्पण केलेली, तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेल्या तरुण-तरुणी यांच्या प्रेमकथेवर चित्रपट निर्माण करायचा, असं राज कपूरनी मनाशी पक्क केलं.



ते दशक होतं १९७०चं. तोपर्यंत प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांमध्ये २५ किंवा त्यापेक्षा मोठ्या वर्षांचा नायक आणि वयाची २० पार केलेली नायिका यांची परिपक्व प्रेमकथा दाखवली गेली होती. टीन एज अर्थात षोडशवर्षीय तारुण्याने मुसमुसलेलं १८-१९ वय असलेला तरुण आणि जेमतेम १६-१७ वर्षांची उमलत्या वयाची तरुणी यांची कोवळी प्रेमकथा रूपेरी पडद्यावर सादर करण्याचा विचार कोणत्याही दिग्दर्शक-निर्मात्याला तोपर्यंत सुचलाही नव्हता.



चित्रपटाचं कथानक रोमियो-ज्युलियटच्या प्रेमकथेवर बेतलेलं असल्याने चित्रपटाचा शेवट शोकात्म असणं आवश्यक होतं; परंतु आधीच आर्थिक नुकसान झालेलं असताना प्रवाहाविरोधातला दुःखद शेवट असला, तर चित्रपट न चालण्याची भीतीदेखील राज कपूरना वाटत होती. वितसरकसुद्धा चित्रपट विकत घेण्यास राजी होणार नाहीत, हे ते जाणून होते. त्यामुळे अडनिड्या वयातल्या या प्रेमकहाणीचा शेवट आनंददायी करण्याचा निर्णय घेतला.



नायक पंजाबी खानदानातील, तर नायिका कॅथलिक. तिचं नावही थोडं वेगळं निवडलं गेलं - बॉबी... एकदम कॅची, पटकन ओठांवर रुळेल असं.



बॉबी, हे नाव पंजाबी मुलांमध्ये अधिक आढळतं. तोपर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्वसाधारण किंवा स्त्रीप्रधान, स्त्रीकेंद्री शीर्षक असलेल्या चित्रपटांमधील नायिकेची नावं एकदम अस्सल भारतीय होती. बॉबी हे शीर्षक त्या तुलनेने संपूर्णत: वेगळं, नवं.



असं म्हटलं जातं की, या चित्रपटासाठी राज कपूरनी मुंबईचा एकेकाळचा स्मगलर हाजी मस्तान व उद्योगपती हिंदुजांकडून कर्ज घेतलं होतं. अर्थात, प्रत्येक काळाच्या म्हणून काही तडजोडी असतात, समझोते असतात. तगून राहण्याच्या इर्षेतून ते होत असतात. त्यात आता डावं-उजवं, चूक-बरोबर ठरवत बसणं याला तसा काहीही अर्थ नसतो. राज कपूर यांच्या संदर्भात हाच विचार करावा आणि पुढे जावं हेच अधिक श्रेयस्कर.



टीनएजर प्रेमकथा असल्याने नायक- नायिकेच्या भूमिका नवेकोरे, ताजेतवाने कलाकार करणार हेसुद्धा राज कपूर यांच्या डोक्यात सुरुवातीपासूनच पक्क होतं. कोणतीही प्रतिमा-इमेज न बनलेल्या नव्या कलाकारांचा रोमान्स पडद्यावर बघणं प्रेक्षकांना नक्कीच आवडणार होतं. म्हणजे त्यावेळच्या चित्रपटसृष्टीमध्ये इतक्या लहान वयाचे अभिनेता-अभिनेत्री नव्हते. हा सर्व विचार करेपर्यंत तारुण्यात पदार्पण केलेल्या आपल्या मुलाला - ऋषीला या चित्रपटाद्वारे लाँच करायचं, या गोष्टीचा मात्र त्यांनी विचारही केला नव्हता.



राज कपूरनी निवड मोहीम सुरू केली, ती चित्रपटाच्या नायिकेसाठी. अभिनेत्री रेखाची धाकटी बहीण राधा त्या काळात कव्हर मॉडेल म्हणून काम करत होती; परंतु राधाला चित्रपटात काम करण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. तिच्या नकारानंतर बेबी फरिदा, सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सुप्रिया देवींची कन्या सोमा चटर्जीसह अनेक मुलींच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यातून निवडलेल्या मुलींपैकी पहिल्या दोन क्रमांकावर नावं होती; ती डिंपल कापडिया आणि नीतू सिंग यांची. त्यांच्यापैकी १६ वर्षांची डिंपल अभिनयाच्या बाबतीत अगदीच कोरी पाटी होती. यापूर्वी तिने कधीच रूपेरी पडद्यावर काम केलं नव्हतं, तर दो कलियां, पवित्र पापी, अशा अनेक चित्रपटांत नीतू सिंगने बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. आर. के. बॅनरच्या प्रत्येक चित्रपटात चरित्र भूमिका करणारे व कपूर कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे अभिनेता कॄष्ण धवन यांची पत्नी मुन्नी धवननी डिंपलचं नाव राज कपूरना सुचवलं होतं. ‘तिची निवड करावी’ असा प्रेमळ आग्रह देखील केला होता. पण केवळ याच कारणामुळेच राज कपूरनी नीतू सिंह ऐवजी डिंपल कापडियाची निवड केली असं नाही, डिंपल सुंदर, फ्रेश ‘हिरॉईन मटेरिअल गर्ल’ तर होतीच; परंतु तिची निवड करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे तिचा चेहरा बराचसा राज कपूर यांच्या एकेकाळच्या नायिकेशी, प्रेयसीशी-नर्गिसशी मिळता-जुळता होता. म्हणूनच डिंपलची निवड केल्यानंतर नर्गिसशी निगडित एक वास्तव प्रसंग पटकथेमध्ये समाविष्ट करण्यात आला.




आता प्रश्न होता नायकाचा. तेव्हा मात्र राज कपूरनी आपल्या मुलाला-ऋषीला नायक बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ऋषी कपूर यांचं वय होतं, १८ वर्षे. राज कपूर त्यावेळी इतक्या मोठ्या आर्थिक विवंचनेमध्ये होते की, ऋषी कपूरना पेश करणं, बॉबीचा नायक बनवणं हा ‘घर की मुर्गी दाल बराबर’असा प्रकार होता. घराबाहेरच्या एखाद्या नव्या अभिनेत्याला घेण्यापेक्षा घरातच अभिनेता आहे. इतकाच माफक विचार त्यावेळी त्यांनी केला होता. एरवी चित्रपटाच्या कथानकाला सर्वाधिक महत्त्व देणारे ते दिग्दर्शक होते. नव्हे, तशी त्यांची ख्यातीही होती. त्यांच्या नजरेत चित्रपटाची कथा हीच खरी नायक होती आणि त्या कथेचं योग्य सादरीकरण म्हणजेच चित्रपट, असं ते मानत होते. आपल्या चित्रपटांतील कुठलीही व्यक्तिरेखा हेतूपुररस्सर लार्जर दॅन लाइफ किंवा खलनायकी दाखवण्यावर त्यांचा विश्वास नव्हता.



anitaapadhye@gmail.com


Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे